पनवेल दि.5: नागरिकांवर अवाजवी मालमत्ता कर लादले जावे याचे आम्ही कधीच समर्थन केले नाही आणि करणारही नाही. मात्र विरोधक या विषयाचा बागलबुवा करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे सातत्याने दिसत आले आहे. वास्तविक मालमत्ता कर आकारणी प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय असताना विरोधक नाहक सत्ताधाऱ्यांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे., असे पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
         तसेच आज मालमत्ता करासंदर्भात ऑनलाईन विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. सभा ऑनलाईन असतानाही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नियमांची पायमल्ली करून सभागृहात प्रवेश केला आणि सभा होऊ न देता फक्त गोंधळ घातला, त्यामुळे  विरोधी पक्षाच्या अशा अत्यंत निंदनीय वागणुकीचा सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सत्ताधारी भाजप आरपीआय तर्फे निषेध व्यक्त केला. 
        शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोशल डिस्टन्सचे नियम पाळून झालेल्या या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी उपस्थित होते. 
  मुंबई, नवी मुंबईला जोडून असलेल्या पनवेल शहर व परिसरात आलेल्या विविध प्रकल्प आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन येथील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व सततच्या पाठपुराव्यामुळे पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले. रायगड जिल्ह्यातील हि पहिली महानगरपालिका आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील नागरिकांसाठी नवीन अशी महानगरपालिका होती. सुरुवातीला प्रशासकीय कारभार नागरिकांच्या अपेक्षेनुसार झाला नसला तरी आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या दृष्टिकोनातून विकास होईल कि नाही अशा प्रकारची भिती पसरवली जात होती. मात्र यामध्ये आम्ही प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले. आम्ही स्वतः गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत तेथील समस्या, अडचणी जाऊन घेतल्या. ‘नो सर्व्हिस नो टॅक्स’ अशी विरोधक वलग्ना करीत होते. परंतु महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्याचे काम होत आहे. 
त्या अनुषंगाने पनवेल शहरात ५० कोटी रुपयांची विकासकामे काढण्यात आली असून या कामांची निविदा ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहेत. ग्रामिण भागातील गावातील ३९ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून त्याचीही निविदा येत्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. तसेच कळंबोली, खारघर या सिडको नोडमधील सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या मैदाने, बगीचे, उद्यानाच्या विकासाकरिता २२ कोटीच्या कामांना मंजूरी मागिल महिन्यात मिळाली आहे. वेळोवेळी जनताभिमुख अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्याचबरोबरीने पनवेल व इतर शहरी भागातही विकासाची कामे सत्ताधारी पक्षाच्या प्रयत्नातून होत आहे. पनवेल महानगरपालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर आकृतिबंध आराखड्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे मागणी आणि त्या संदर्भातील सतत पाठपुरावा केला.  त्यानुसार आकृतिबंध आराखडा मंजूर झाला आहे. त्यामुळे महापालिका आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतीलदेवीचापाडा, चाळ, घोट, कळंबोली, रोडपाली, पडघे, पालेखुर्द, ढोंगऱ्याचापाडा, टेंभोडे, बिड, आडिवली, रोहींजण, नागझरी, तळोजे मजकूर, खिडूकपाडा, वळवली, आसुडगाव, धानसर, धरणागाव धरणाकॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले व कोयनावेळे या महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व नगर भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील रहिवाशांना फार मोठा दिलासा आणि न्याय मिळवून देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. अशी एक ना अनेक कामे आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून होत असताना मात्र विरोधकांना याचे श्रेय मिळत नसल्याने त्यांच्या मनात सल निर्माण झाली आहे. पहिल्या निवडणुकीत मतदारांनी नाकारून दारुण पराभव केल्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्यासमोर कसे जाणार याची चिंता त्यांच्या मनात घर करून बसली आहे, म्हणूनच कुठलाही मुद्दा उरला नसल्याने विरोधकांनी नागरिकांना वेठीस धरून मालमत्ता कराचा विषय पराचा कावळा करून सोडला आहे. मालमत्ता कर हा विषयच प्रशासनाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि त्याला अनुसरून सत्ताधाऱ्यांची नाहक बदनामी करण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे, तो थांबण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. सर्व्हिस देतो म्हणूनच मालमत्ता कर घेतला जाणार आहे, आणि नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन मालमत्ता कर कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही हि विशेष सभा बोलावली होती, मात्र विरोधकांना हि सभा होऊन द्यायची नव्हती म्हणून त्यांनी ऑनलाईन सभेत मत न मांडता थेट सभागृहात कोरोना नियमांचे तसेच राज्य सरकारच्या नियमांची पायमल्ली करून प्रवेश केला आणि गदारोळ माजवला असेही यावेळी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले. २०१७ साली महानगरपालिका निवडणुकीत ग्रामीण भागात कर वाढवणार नाही हे वचन दिले होते, आणि ते आम्ही वचन पाळणार असेही त्यांनी आवर्जून सांगितले. नगरसेविका लीना गरड यांना पक्षाने वेळोवेळी जबाबदारी, महापालिकेचे महिला व बाल कल्याण सभापती पद ही दिले, पक्षाने सन्मान केला. मात्र त्यांना जनतेची कदर नाही तर स्टंटबाजी करत स्वतःची प्रसिद्धी, आणि लोकांमध्ये भडकविण्याचे काम त्या करत आहेत. असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!