पनवेल दि.29: लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे अद्यापही उघडले नाहीत, ती सुरु करण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात आरती करून घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा दार दार उघड’ दारूचे नव्हे तर भक्तीचे दार उघड अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
कोरोना काळात जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यातील, मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले परंतु  संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त करून ठेवले आहे म्हणून सर्वे धार्मिक स्थळे व मंदिरे तात्काळ खुली करण्यात यावी, या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्यावतीने आज (शनिवार दि. २९) ‘दार उघड उद्धवा दार दार उघड’ घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला. पनवेल शहरातील श्री. ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरासमोर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून भर पावसात हे आंदोलन झाले. यावेळी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेवक मदन कोळी, माजी नगरसेविका नीता माळी, संजय जैन, पवन सोनी, अमरिश मोकल, छतरमल मेहता, मनोज डेडिया, अभिजित जाधव, चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी, आदी उपस्थित होते.  त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणीही हे आंदोलन झाले. आंदोलनात आध्यात्मिक आघाडी, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक सहभागी झाले होते.
      महाविकास आघाडी सरकार भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे, ‘भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने ४ जून २०२० रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू केलेली सुद्धा आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. मात्र पुनश्च ‘हरिओम’ म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. राज्यातील देवस्थानाचे धार्मिक स्थळे सुरू करून भजन किर्तन व भजन परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थान तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिकांनी सर्वत्र देवस्थान मंदिरे धार्मिक स्थळासमोर ‘घंटानाद’ आंदोलन सामाजिक अंतराचे पालन करून केले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. मंदिरे दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरे खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!