पनवेल दि.२५(हरेश साठे) शिक्षकांच्या प्रश्नांची जाण शिक्षकालाच असते राजकीय पुढारी शिक्षकांचे नेतृत्व करूच शकत नाही, त्यामुळे शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पनवेल येथे आज केले.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (एम.ए.बी.एड.) यांच्या प्रचारार्थ सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार भगवान साळुंखे सर, भाजपचे प्रदसेह सदस्य बाळासाहेब पाटील, सुधागड एज्युकेशन संस्थेच्या कार्याध्यक्षा गीता पालरेचा, डी. डी. विसपुते संस्थेचे धनराज विसपुते, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, वामन म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल,माजी सभागृहनेते परेश ठाकूर, बाळासाहेबांची शिवसेनाचे रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
नामदार दीपक केसरकर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, कोकण आपल्या हक्काचे असून ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना विजयी करण्याचा विडा आमदार प्रशांत ठाकूर यांनी उचलला आहे. शिक्षण हे सर्वात पवित्र काम आहे यातून उद्याची पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांची जाण आणि काळजी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.नवीन शैक्षणिक धोरण विश्वामध्ये अग्रेसर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असून शिक्षक आणि विद्यार्थी यांना केंद्रबिंदू मानून काम होत आहे. या धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण मंत्री म्हणून आम्ही गांभीर्याने बघत आहोत. शिक्षकांसाठी ११६० कोटींचे पॅकेज आणि त्याची अंमलबाजवणी करण्यात येत आहे मात्र विरोधकांना टीकेशिवाय काहीही उरलेले नाही. तर आम्ही शिक्षकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कार्यरत आहोत. हे सरकार प्रत्येकाची काळजी घेणारे आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडत आहे. शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचे काम सरकार करत आहे त्यामुळे मंत्रालयात कुठल्याही एजंटला थारा दिला नाही. असे सांगतानाच कमी पटसंख्या असली तरी शाळा बंद करणार नाही. उलट मार्च महिन्यात शिक्षक भरतीचे प्रयोजन असल्याचे त्यांनी नमूद केले. आता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यासुद्धा देणार असल्याचे त्यांनी नमूद करून विद्यार्थ्यांच्या दफ्तारचे ओझे कमी करण्याचे काम करणार असून तसे प्रयोजन आपण करत आहोत. भारत जगातील तरुण देश आहे त्यामुळे आपल्या मातृभाषेला महत्त्व देण्याचे काम करण्यात येणार असून त्यातील एक महत्वाचे पाऊल म्हणून अभियांत्रिकी शिक्षण मराठीत उपलब्ध होणार आहे आणि शिक्षण मातृभाषेत करण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्र मागते पडत चालला होता त्याला गतवैभव देण्याचे काम भाजप शिवसेना सरकार करीत आहे त्यामुळे युती अभेद्य आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही नामदार दीपक केसरकर यांनी आवर्जून नमूद केले.
नामदार रविंद्र चव्हाण यांनी म्हंटले कि, कोकण शिक्षक मतदार संघाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे दिली आहे. गेली अनेक वर्षे कोकणची जबाबदारी पार पडत असताना अनेक गोष्टी बारकाईने पहिल्या आहेत. मागील निवडणुकीत २८०० मतदार चुकले, त्यामुळे योग्य प्रकारे मतदान झाले पाहिजे कुठलीही चूक होऊ नये यासाठी आपण सर्वानी दक्ष राहणे गरजेचे आहे. शिक्षकांचा आमदार शिक्षकच झाला पाहिजे आणि हा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळे काळजी घ्या योग्य प्रकारे मतदान करा, असे आवाहन ना. चव्हाण यांनी करून मतदान प्रक्रियाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाची पद्धत उत्तम आहे. कणखर आवाज आणि त्यांच्या कामाचा आढावा पाहता शिक्षकांमध्ये शिक्षकांमध्ये स्फूर्ती तयार झाली आहे. राजकीय पक्ष, मित्रपक्ष तसेच २१ संघटनांचा पाठिंबा मिळाला असून ताकद वाढली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे प्रथम पसंतीने निवडून येणार आहेत, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले. शिक्षण क्षेत्रात काम करणारे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, चेअरमन अनिल पाटील यांनी रयत संस्थेच्या कोणत्याही शिक्षकावर दबाव टाकणार नाहीत, त्यामुळे या संस्थेतील शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार मतदान करता येणार आहे. नामदार दीपक केसरकर आणि रवींद्र चव्हाण कमी बोलतात पण काम प्रचंड करतात त्यामुळे या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मोठी ताकद मिळाली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपाने योग्य उमेदवार दिला गेला आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय देण्याचे काम होणार आहे त्यामुळे आता शिक्षकांना घाबरायची गरज नाही, असे नमूद करतानाच ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी म्हंटले कि, शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी केवळ शिक्षकच आमदार असणे गरजेचे आहे आणि कोकण मतदार संघाचा हा इतिहास आहे. या मतदार संघाच्या अनुषंगाने २०१७ पर्यंत केवळ शिक्षकच आमदार होत. शिक्षकांसाठी भाग्याची गोष्ट आहे कि त्यांना ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या रूपाने योग्य प्रतिनिधी मिळाला आहे. शिक्षकांचे प्रश्न समजून ते योग्य प्लॅटफॉर्मवर मांडण्याची आवश्यकता असते. शिक्षक आमदाराने ठरवले तर तो शिक्षकांसाठी काहीही करू शकतो. मात्र शिक्षकांच्या जीवावर निवडून आलेल्या बाळाराम पाटील यांनी येथील शिक्षकांच्या विषयाला हातच घातला नाही, फक्त राजकीय खेळी करण्याचे काम केले, असा सणसणीत टोला लगावला. ज्ञानेश्वर म्हात्रे सर कोकण मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात शिक्षकांपर्यंत पोहोचलेले आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना किमान ६० टक्के मते मिळवून देऊ असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासित केले.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले कि, २०१७ साली निवडणूक लढवली त्यावेळी मी नवीनच होतो. त्यावेळी पराभव झाल्यानंतरही मी थांबलो नाही शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक गतीने काम करायला सुरुवात केली. स्व. रामनाथ मोते सर, वेणुनाथ कडू सर आणि मी एकाच विचाराची माणसे होतो. आमच्यात विसंगती आल्याने त्यावेळी मतांच्या विभाजनामुळे आमचा पराभव झाला. आणि हातात पुस्तक न घेतलेला, फळा माहित नसलेला व अभ्यास नसलेला व्यक्ती बाळाराम पाटील निवडून आला. त्यावेळची चूक महागात पडली ती आता सुधारली जात आहे. नामदार रवींद्र चव्हाण यांनी माझी धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान आदर्श आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर करिष्मा करणारे आहेत. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, भाजप, शिवसेना, आरपीआय, मित्रपक्ष आणि शिक्षक संघटना कार्यरत आहेत. सहा वर्षात आपण शिक्षक आणि संस्थेची कामे पूर्ण करून दिले असून प्रत्येक जण आनंदाने स्वागत करीत आहे. सातपैकी चार आमदार शिक्षक नाहीत त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहे. हे सरकार गोरगरिबांना न्याय देणारे आहे. या राज्य सरकारने ११६० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करत ६१ हजार शिक्षकांना न्याय दिला आहे. शिक्षक नसलेल्या माणसाने आमदार होऊन वाटोळे केले आहे. या आमदाराने विधिमंडळात अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीने प्रश्न मांडला आणि शिक्षकांची दिशाभूल केली. पेन्शनवर काम सुरु आहे आणि सत्तेतील हे सरकारच ते करू शकतात. त्यामुळे मी निवडून आल्यावर तुमचा प्रतिनिधी म्हणून पहिला पेन्शनचा प्रश्न सोडवणार आहे. या आमदाराने स्वतःच्या संस्थेतील शिक्षक रमेश देवरुखकर यांचे निलंबन केले, भोपींचा पगार लट्कवला अशी बरीच प्रकरणे आहेत. तसेच आता निवडणुकीत फिल्टर वाटत सुटले आहेत. शिक्षकांसाठीचा निधी त्यांनी गटारांवर वापरला, अभ्यासक्रमावर बोलण्याचे काम शिक्षक आमदाराचे असते पण ते न करता राजकीय लुडबूड केली. मी आमदार म्हणून मिरवणार तर तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करीन. शिक्षक आमदार असताना बाळाराम पाटलांना तसे कधीही लिहिता आले नाही ते लिहायला त्यांना लाज वाटली, असा सणसणीत टोला लगावत शिक्षकांचा निधी मी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च करणार असल्याचेही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आश्वासित केले.
या मेळाव्यास भाजपचे विस्तारक अविनाश कोळी, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, विनोद साबळे, माजी उप महापौर सीता पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अनिल भगत, प्रकाश बिनदार, बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, रुपेश ठोंबरे, मयुरेश नेतकर, रोहित जगताप, सुदाम माळी, विकास पाटील, भोसले सर यांच्यासह शिक्षक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!