पनवेल दि.८: रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन करतात. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ असे म्हणत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि कलाकारांच्या अविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धांचे नियोजन केले जाते. एकांकिका स्पर्धेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर ही संकल्पना पहिल्यांदा अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेने ‘अटल करंडक’मार्फत केली आणि कोकणचा कोहिनूर ओंकार भोजनेला बॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले. कोरोना काळात नाट्यगृह बंद झाले, पण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जिद्द आणि योग्य नियोजनामुळे टाळेबंदी काळात यशस्वीरित्या स्पर्धा झाल्या.
एकपात्री अभिनय स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित असून वयोगट 12 ते 18 वर्ष आणि 19 व 19च्या पुढील असे आहेत. याकरिता प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये व चषक, द्वितीय तीन हजार रु. व चषक, तृतीय दोन हजार रु. व चषक, उत्तेजनार्थ (एकूण दोन पारितोषिके) एक हजार रु. आहे.
द्विपात्री अभिनय स्पर्धा महाराष्ट्र राज्यपुरता मर्यादित असून तिचा गट खुला असणार आहे. यासाठी विषय हा विनोदी (कॉमेडी) आहे, तर प्रथम पारितोषिक 10 हजार रु. व चषक, द्वितीय एक हजार रु. व चषक, तृतीय सात हजार रु. व चषक, उत्तेजनार्थ (एकूण दोन पारितोषिके) पाच हजार रु. आहे.
स्पर्धक आपला अभिनय मराठी किंवा हिंदी भाषेत सादरीकरण करू शकतात. जी भाषा निवडाल ती 80% सादरीकरणामध्ये असावी. प्राथमिक फेरी ऑनलाइन, तर अंतिम फेरी प्रात्यक्षिक असेल. मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन व्हिडीओ natyaparishad.panvel@gmail.com या ईमेल वर पाठवावा. एकपात्री स्पर्धेसाठी 50 रु. व द्विपात्री स्पर्धेसाठी 100 रु. प्रवेश फी असून ती भरल्यावरच प्रवेश पक्का केला जाईल. कुठल्याही परिस्थितीत एकदा भरलेली प्रवेश फी परत केली जाणार नाही. सादरीकरण करण्यासाठी एकपात्री करताना कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 7 मिनिटांची आणि द्विपात्री करताना कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 10 मिनिटे वेळ असेल. सादरीकरण अश्लील अथवा प्रक्षोभक व सामाजिक तेढ निर्माण करणारे नसावे. वेशभूषा, केशभूषा, संगीत आवश्यक नाही. स्पर्धकांना ते आवश्यक वाटल्यास त्याची व्यवस्था स्पर्धकांनी करावी. कोणत्याही प्रकारचा खर्च स्पर्धकांना दिला जाणार नाही. अंतिम फेरीत प्रवेश मिळालेल्या स्पर्धकांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स स्पर्धेच्या वेळी आणावी. अंतिम फेरीची तारीख 27 व 28 ऑगस्ट आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी गणेश जगताप (9870116964) किंवा अमोल खेर (9820233349) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व रंगकर्मींना ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची उत्सुकता असतेच. एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरी दिवशी अटल करंडक स्पर्धेची तारीख जाहीर केली जाणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!