पनवेल दि.5: रायगडात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडया आणि पाड्यांना सर्वाधिक बसला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज चक्रीवादळ ग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, आदी उपस्थित होते.
०३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील पाच लाख घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या तांडवामुळे लाखो झाडे उन्मळून पडले आहेत. त्याचबरोबर वाहनांवर महाकाय वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील नेरे आणि शिरवली परिसराला मोठ्या प्रमाणात बसला. तालुक्यात जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे. सव्वादोनशे एकर शेतीचे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. दीड हजारांच्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. विशेष करून आदिवासी वाड्या पाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. तर काहींच्या घरांच्या भिंतीची चक्रीवादळामुळे पडझड झाली. अगोदरच कोरोना या वैश्विक संकटात हवालदिल झालेला आदिवासी वाड्या पाड्यांवर चक्रीवादळाची अवकृपा झाल्याने नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली. त्यांनी टावर आणि सतीच्या वाडीला सुरुवातीला भेट दिली. त्या ठिकाणी नुकसानग्रस्त आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लवकरात लवकर पंचनामे करून संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. त्यानंतर इतर ठिकाणीही जाऊन त्यांनी पाहणी केली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!