रत्नागिरी दि.04 (सुनिल नलावडे):- निसर्ग चक्रीवादळाने तळकोकणात विषेश करून रत्नागिरी जिल्हयामध्ये हाहाकार उडवला असून प्रचंड हानी झाली आहे. वादळीवाऱ्या बरोबर पडलेल्या प्रचंड पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले बिज पाण्याच्या बरोबर वाहून गेल्याने शेतकरी हवालदील बनला असून त्याच्यावर आता पुन्हा दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले आहे. असलेल बियाण त्याच्या जवळ संपल असल्याने आता नविव भात बियाण खरेदी करून शेत जमिनीचे मशागत करून पुनर पेरणी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेले दोन दिवस जिल्हयात प्रंचड पाऊस कोसळल्यामुळे नुकसानीची परिस्थिती वाढतच आहे.
जिल्हयातील गुहागर, दापोली, मंडणगडमध्ये सुपारीच्या बागा, फणसाची व आंब्याची झाडे मोठया संख्येने उन्मळून पडली अनेक झाडे राहत्या घरांवर कोसळली तशी स्थिती उर्वरित राजापूर, लांजा, रत्नागिरी,संगमेश्वर, चिपळूण तालुक्यामध्येही झाली आहे. निसर्गवादळाचा नुकसानीचा आकडा काही कोटीच्या घरात गेला आहे.
वादळाचा फटका विजवितरण कंपनीला मोठा बसला असून तळकोकण अर्धेअधिक अंधारात आहेत. मोबाईल टॉवर वादळाच्या तडाख्यात कोसळून पडल्याने टेलिफोनसह दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाती असलेला काजू त्याचीही आंब्याबरोबर नुकसानी झाली आहे. शेकडो घरांची या वादळाने नुकसानी केली. मनुष्यहानी प्रशासनाच्या चोख व्यवस्थेमुळे टळली आहे.
जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करायला सुरुवात केली. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठं नुकसान झालं आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावात सुमारे 80 घरांचं या वादळात नुकसान झालं आहे.
पाजपंढरीतील दोन जण वादळात जखमी झाले आहेत. आगरवायगणी येथील विरेंद्र येलंगे यांचा एक बैल तर आंजर्लेतील राजेश बोरकर यांच्या गायीचा मृत्यू झाला आहे. आंजर्लेतील मंगेश महाडिक यांच्या सुमारे 48 कोंबड्या मृत पावल्या आहेत. आवाशी येथील 6 घरांचे नुकसान झालं आहे. जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदाराचे मोठं नुकसान झालं आहे. सुमारे 500 पोफळी, 20 आंबा कलमे, सहा फणस झाडे पडली आहेत. वाऱ्यामुळे झाडावरील आंबा जमिनीवर पडून नुकसान झालं आहे.
या वादळाचा फटका किनारपट्टी भागातल्या लोकांना जास्त बसला. किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचा आकडा सध्या सांगणं कठीण आहे. मात्र दापोली तालुक्यातील अनेक भागात गेल्या 48 तासांपासून वीज गायब आहे. अजून दोन ते तीन दिवस इथं वीज येणं कठीण आहे. 2009 साली झालेल्या फयान वादळापेक्षाही जास्त नुकसानी या निसर्गवादळात बोलले जाते.