यावर्षीच्या गुढीपाडव्याची तीन वैशिष्ट्ये !
श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे !
नवीन शालिवाहन शकवर्षाबरोबरच राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ !
कोरोनानंतर शोभायात्रांना उदंड उत्साहात प्रतिसाद मिळणार !
मुंबई दि.१८: बुधवार दि. २२ मार्च रोजी श्रीशालिवाहन शके१९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. यावर्षीच्या गुढीपाडव्याची काही वैशिष्ट्ये आहेत. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. तसेच गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत आहे. यापूर्वी सन २००४ मध्ये असा योग आला होता आणि या वर्षानंतर सन २०४२ मध्येही गुढीपाडव्याच्याच दिवशी राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार आहे असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले .
याविषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६ ॲागस्ट २०२३ श्रावण अधिकमास आलेला आहे. त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी , नवरात्र, विजया दशमी, दीपावली इत्यादी सण १९ दिवस उशीरा येणार आहेत. ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो , त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ॲागस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आले आहेत.
या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत आहे. २ जून २०२३ रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सुवर्ण खरेदीदारांसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त देण्यात आले आहेत.
कोरोना संकटानंतर हा गुढीपाडवा येणार असल्याने गावोगावी निघणार असलेल्या शोभायात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने लोक भाग घेणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.