पनवेल दि.२०: राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे अकाली निधन झाले आहे. या दुःखद बातमीने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. गेली ५ वर्षे शरद पवार यांच्या पाठीमागे ते सावलीसारखे उभे होते. दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमातून घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते स्वत:हून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दुर्दैवाने आज दि.20 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशांत पाटील यांनी 1995 साली प्रथम विधानसभा निवडणूक लढविली होती. शिवसेना रायगड जिल्ह्याचे ते जिल्हाप्रमुख होते. त्यानंतर त्यांनी गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवार साहेबांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले. प्रशांत पाटील यांची मुलूख मैदान तोफ म्हणून राजकारणात ओळख होती. यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत पाटील यांचे अंत्यविधी उरण – कामठा येथे सांयकाळी ७ वाजता होणार आहेत.