कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
भाजपच्यावतीनेही आभार आणि जल्लोष

पनवेल दि.१६ (हरेश साठे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे, त्याबद्दल लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्यावतीने आज या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २९ तारखेला सरकार अल्पमतात असताना घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तीचा सन्मान केला. त्याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सदरचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालय येथे उत्तर रायगड भाजपच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला. दिबासाहेबांचा विजय असो, दिबासाहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हा संयोजक डॉ. कृष्णा देसाई, निर्दोष केणी, मधुकर उरणकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!