पनवेल दि.११: देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील आणि रायगड जिल्हयात येणाऱ्या पनवेल, उरण, कर्जत विधानसभा मतदार संघाचा कार्यक्रम पनवेल येथे संपन्न झाला.

 या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, उपाध्यक्ष कविता चौतमोल, वसंत भोईर, मंगेश म्हसकर, रामदास ठोंबरे, सुभाष कदम, ब्रिजेश पटेल, रत्नप्रभा घरत, पनवेल मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष प्रविण मोरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. 

   प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पनवेलमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी शहरातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल, उरण, कर्जत विधानसभेतील पदाधिकारी व पाच हजारहून जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोलताशा, लेझीमची साथ, ब्रास बँडवर कोळी नृत्य, नागरिकांकडून पुष्पवृष्टी तसेच स्वागत लक्षणीय होते. ज्येष्ठ व महिला कार्यकर्त्यांचा उत्साह, युवांचा जल्लोष पहायला मिळाला. 'मोदी मोदी' नावाचा गजर सर्वत्र दणाणून गेला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ’घर घर चलो संपर्क’ अभियान रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर नागरिकांना मोदी सरकारने ९ वर्षात केलेल्या योजना आणि निर्णयांची माहिती असलेली पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते. यावेळी ’मेरी माटी मेरा देश’ अभियानही राबविण्यात आले. त्यानंतर चौक सभेच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. त्यानंतर बुथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेल्या पनवेल, उरण, कर्जत विधानसभा वॉरियर्सची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच या कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुकही केले. तसेच हा दौरा यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. 

    यावेळी चौक सभेतून मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले कि, भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे, आणि या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना अभिमान आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील किमान ४५ जागा जिंकायचा निश्चय आणि त्या अनुषंगाने प्रवास सुरु आहे. मी राज्यात अनेक ठिकाणी फिरत असताना लोकांशी संवाद साधला असता ९५ टक्क्यापेक्षा जास्त लोकांची पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांशी चर्चा करतो त्यावेळी ते स्वतःहून मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतुक व आभार व्यक्त करतात. देशाच्या इतिहासात मोदी यांनी अनेक योजना राबवताना त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. काँग्रेसने ३७० कलम लागू करून काश्मीरचे तुकडे करण्याचा प्रयत्न केले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ३७० कलम हटवले आणि काँग्रेसने केलेले पाप धुऊन काढले. आणि आता काश्मीरच्या लाल चौकात देशाचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकत आहे ते मोदी यांच्यामुळे. मुस्लिम महिलांना मुस्लिम महिला विवाह अधिकारांचे संरक्षण देण्याचे काम करत तिहेरी तलाकला गुन्हेगार ठरवणारा भारतीय संसदेचा कायदा मोदीजींनी केला. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय देण्याचेही काम झाले. विरोधक अयोध्या मंदिराबाबत अनेक टिप्पण्णी करत राहिले पण मोदीजींनी प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारणी करून दाखवत विरोधकांची बोलती बंद करून टाकली. महिला निवडणुकीत आरक्षण देत आता त्यांना प्राधान्य देण्याचे काम करण्यात आले ते सुद्धा मोदीजींच्या दृरदृष्टीतून देशाच्या महिलांना सक्षम करण्यासाठी उचलण्यात आलेले एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप महायुतीला चिंता नाही त्यांच्याकडे अष्टपैलू देवेंद्र फडणवीस आहेत. हिंदुत्वाची कास सोडलेल्या उद्धव ठाकरेंना सोडून संस्कृतीची जाण असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी मोदींना साथ दिली आहे, असे सांगून भाजप महायुतीचा महाविजय होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

   जो चांगले भाषण करत नाही तो नेता होऊ शकत नाही असे विजय वडेट्टीवारांनी म्हंटले आहे, त्यामुळे राहुल गांधींना चांगले भाषण येत नाही त्यामुळे ते नेता नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. असे सांगतानाच मोदींना हरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे २८ पक्ष मुंबईत हयात हॉटेलमध्ये भोजनावली करून गेले. आणि यांच्या पार्ट्यातील तामिळनाडूचे उदयानिधिने हिंदू धर्माबद्दल बेताल वक्तव्य केले आणि हे उद्धव ठाकरे व शरद पवारांनी कसे खपवून घेतले असे सांगतानाच हिंदू संस्कृतीचे असाल तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी आघाडीतून बाहेर पडा असे आव्हानही त्यांना दिले. 
  यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सबका साथ सबका विकास या अनुषंगाने प्रगती होत आहे. आपण कार्यकर्ते म्हणून भाग्यवान आहोतच. रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, रस्त्यांचे जाळे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याचा विकास होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना आपण येथून ५६ हजारांची आघाडी दिली तर विधानसभा निवडणुकीत ९३ हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा भरघोस मतांनी विजय होण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने या लढाईत उतरावे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 
    प्रास्ताविकातून प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी, या रॅलीतून भगवा झंझावात निर्माण झाल्याचे सांगितले. जनता हाच परिवार मानून भाजप काम करत असून जनतेचा मूड भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरून संवाद साधत असून आतापर्यत ४८ पैकी २० लोकसभा मतदार संघाचा प्रवास झाला आहे असे सांगतानाच आपले आमदार प्रशांत ठाकूर पुन्हा भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आजच्या रॅलीत मी १४२० लोकांना भेटलो. सर्वानी मोदीजींना आपला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर मी विविध समाजातील लोकांची भेटही घेतली उत्तम वातावरण येथे आहे. मुस्लिम, ख्रिश्चन बांधव मला भेटले आमदार प्रशांत ठाकूर यांनी कब्रस्तानचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला असल्याचे सांगितले. आजच्या निमित्ताने पनवेलची हि ऊर्जा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे. – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!