[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2020/02/photo-2880-scaled.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true]

पनवेल दि.२०: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुढे माहिती देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथमच देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, तर सन्माननिय उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अधिक माहिती देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांचे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण कायम रहावे, यासाठी महाराष्ट्र राज्य स्तरावर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला भगत साहेबांच्या नावाने पुरस्कार देवून सन्मान करण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीत या वर्षांपासून गुणीजन व्यक्ती किंवा संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार माझ्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली. या समितीत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांचा समावेश असून या समितीने सखोल चर्चा करून घेतलेल्या निर्णयानुसार थोर विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना संस्थेच्या वतीने हा पहिला पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन १९६३-६४ साली स्व. जनार्दन भगत साहेबांच्या नेतृत्वात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर गव्हाण येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची स्थापना झाली आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ या परिसरात रोवली गेली. त्याचबरोबर संस्थेच्या जासई, फुंडे, नावडे, वावंजे या ठिकाणीही विद्यालये सुरु करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्व. दि. बा. पाटील, द्त्तूशेठ पाटील यांच्या समवेत पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्थापनेतही त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. तळागाळातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, यासाठी स्व. जनार्दन भगत साहेब, प्रा.डॉ. एन. डी. पाटील यांनी अविरत कष्ट घेतले व त्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक तत्वांचा प्रसार त्यांनी सातत्याने केला. त्यामुळे संस्थने मोठी उभारी घेऊन नावलौकिक प्राप्त केला. कर्मवीर अण्णा व प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्य प्रेरणेतून आणि जनार्दन भगत साहेबांच्या आशिर्वादाने ०१ जानेवारी १९९२ रोजी पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आज हि संस्था के.जी. ते पीएचडी असे विविध कोर्सेस असलेली आणि दर्जेदार भौतिक सुविधा, उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण असलेली संस्था म्हणून नावारूपास आली. या संस्थेच्या वाटचालीत प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून महाराष्ट्रभर शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी केल्याबद्दल त्यांचा स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. स्व. जनार्दन भगत यांची जयंती दर चार वर्षानी येत असते. त्या अनुषंगाने दर चार वर्षांनी भगत साहेबांच्या जयंतीला राज्य स्तरावर सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला भगत साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संचालक संजय भगत, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बो-हाटे, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः विशेष लक्ष देत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी . गडदे, यांच्यासह संचालक मंडळ व सहकारी विशेष मेहनत घेत असल्याची माहिती प्राचार्य वसंत बो-हाटे यांनी दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!