पनवेल दि.२४: प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपयांची घोषणा राज्याचे कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता, पर्यटन, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केली. ते महारोजगार मेळाव्यात बोलत होते.
भूमिपुत्रांचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच ‘दिबां’ना अभिवादन केले. त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी या मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, गुलाब वझे, दीपक म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी जनतेसाठी खूप काही केले आहे. त्यांचे महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. ते लक्षात घेता त्यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये विविध नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. त्या मिळणे स्थानिकांचा हक्क आहे. त्यासाठी येथे 30 दिवसांच्या आत स्कील सेंटर उभे करू, असे सांगून राज्यात नवे सरकार आल्यानंतर सातशेपेक्षा जास्त रोजगार मेळावे महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले. आज पनवेलमध्ये मेळावा होत आहे. येथे बेरोजगार उमेदवारांना नोकरी-रोजगारासाठी महसूल अधिकारी सर्व माहिती देतील. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्वयंरोजगारासाठी कर्ज हवे असेल तर आमची जबाबदारी आहे की त्यासाठी योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ते मिळवून देणे. या मेळाव्यानंतरही तुम्हाला जे काही सहकार्य हवे असेल ते आमचे दोन्ही आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी करतील, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी लढा उभारण्यात आला होता. त्या अंतर्गत झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत मीही आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू, असे मंत्री लोढा यांनी म्हटले.
सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी लोकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केली.
सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. जनतेचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी वेळोवेळी आवाज उठविला. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे याकरिता समस्त भूमिपुत्रांनी ऐतिहासिक लढा दिला आणि त्याला यश येऊन या विमानतळाला राज्य सरकारने ‘दिबां’चे नाव देण्याचे जाहीर केलेले आहे. आता समितीमार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
कृती समितीचे सल्लागार व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश बालदी यांनीही विचार व्यक्त करून उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या. जे. डी. तांडेल यांनी सर्वांचे आभार मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!