पनवेल,दि.11 : पनवेल महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडून 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांना परिवहन योजनेअंतर्गत यावर्षी आत्तापर्यंत 385 लाभार्थ्यांनी बस भाडे सवलतीचा लाभ घेतला आहे.
‘बस भाडे सवलत योजना’ नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमांच्या साहाय्याने 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांकरिता राबविली जाते. या योजनेअंतर्गत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बस भाड्यात 100 टक्के सूट दिली जाते, तसेच जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना बस भाड्यात 50 टक्के सवलत दिली जाते.
या योजनेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेकडे येणाऱ्या अर्जाची छाननी करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या तुर्भे येथील कार्यालयांमध्ये सवलतीसाठीचे अर्ज पाठविले जातात. यावर्षी योजनेअंतर्गत एकुण 385 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये 139 जेष्ठ नागरिक, 17 वर्षाखालील 25 विद्यार्थी, 193 दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
याचबरोबर दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये एक व्यक्ती दिव्यांग असल्यास 25 हजार रूपये तर दोन्ही व्यक्ती दिव्यांग असल्यस 40 हजार रूपयांचे अर्थसहाय्य महापालिकेच्यावतीने करण्यात येते.
तसेच कुष्ठरोग बांधवांना औषधोपचारासाठी दरमहा 4 हजार रूपयांचे अर्थसहाय्य महापालिकेच्यावतीने करण्यात येते. यावर्षी 27 कुष्ठरोगी बांधवाना औषधोपचारासाठी दरमहा 4हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.