पनवेल,दि.3 :पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियान राबवित आहे. आज कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयाच्या एनएनएसच्या विद्यार्थ्यांना ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियानात सामील करून घेण्यात आले. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. झेंडा फडकविण्याबाबतचे निर्देश, सूचना सांगितल्या तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी शुभेच्या दिल्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मनिषा बनसोडे,एनएसएस विभाग प्रमुख जाधव तसेच एनएनएसचे 350 विद्यार्थी उपस्थित होते.
नागरिकांना या अभियानाची माहिती व्हावी यासाठी एनएसएसचे विद्यार्थी कळंबोली परिसरातील सुमारे साडेतीन हजार घरांना भेट देणार आहेत. तसेच ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची माहिती सांगून, जनजागृती विषयक पत्रकांचे वाटप करणार आहेत.

तसेच ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साजरा करावा या उद्देशाने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, हौसिंग सोयायटी अध्यक्ष – सचिव व सक्रिय कमिटी मेंबर्स, सामाजिक संस्था व बचतगट यांचे नुकतेच गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या चर्चासत्रात उपायुक्त विठ्ठल डाके यांनी नागरिकांना ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाबद्दल माहिती दिली. तसेच नागरिकांच्या विविध शंकाचे निरसन केले.
या चर्चासत्रात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, पनवेल, कळंबोली भागातील विविध सोसायट्यांमधील नागरिक,सामाजिक संस्था, बचत गट यांचे सदस्य यांनी सहभाग घेतला व महापालिकेला या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरोघरी झेंडा फडकविण्याबाबतचे मार्गदर्शन नागरिकांना केले. तसेच या अभियानासाठी राष्ट्रीय ध्वज उपलब्धतेसाठी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबतचा फोटो (सेल्फी) पालिकेच्या ‘पनवेल महानगरपालिका’ या फेसबुक अकाउंटला टॅग करण्याबाबत सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!