मुंबई दि.२०: येत्या 27 जून रोजी पंतप्रधान मोदी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे. मेक इन इंडिया धोरणानुसार आयसीएफ (ICF) द्वारे निर्मित या हाफ–हाय-स्पीड ट्रेन्स देशभरातील विविध शहरांना जोडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी 27 जून रोजी एकाच वेळी देशातील पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे अनावरण करणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच रेल्वे 27 जूनपासून धावणार आहे.
कोकण मार्गावरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेली मुंबई-गोवा वंदे भारत ३ जून रोजी धावणार होती. मात्र आदल्या दिवशी बालासोर येथे रेल्वे अपघात झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता २७ जून रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत.