पनवेल दि.१२: सिडकोने ३१ मे पर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे अन्यथा तारीख जाहीर करणार नाही मनात येईल तेव्हा सिडकोमध्ये घुसून सिडकोच्या अधिकाऱ्यांना सळो का पळो करून सोडू, असा ईशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज कामोठे येथे सिडको प्रशासनाला दिला आहे.
सिडकोने वसविलेल्या कामोठेमध्येही गेेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. प्यायला पाणी नसतानाही सिडको मात्र नवीन प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देत सुटली आहे. पाण्याचे योग्य नियोजन सिडको करीत नाही त्यामुळे या अन्यायाविरोधात कामोठे भाजपच्यावतीने सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करण्यात आले असून अनियमित पाणी पुरवठ्याबाबत भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोमोठे येथे आज आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात उपमहापौर सीता पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका अरुणा भगत, हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, राजेश गायकर, राजेश म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्षा वनिता पाटील, ऍड. आशा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसंख्या वाढत गेली तसे पाण्याचे प्रमाण कमी झाले. तरीसुद्धा सिडको या संदर्भात नियोजन केले नाही, त्यामुळे अनियमित पाणी पुरवठा नित्याचे झाले, या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोकडे पाठपुरावा भाजपच्यावतीने करण्यात आला. मात्र सिडको नवनवीन प्रकल्पांना पाणी देत असताना त्यांना जुन्या गृहसंकुलांचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
जो पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा ईशारा यावेळी सिडकोला देण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, रहिवाशांना मुबलक आणि नियमित पाणी देण्यासाठी सिडकोने नियोजन केले पाहिजे, संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे पण तसे अधिकारी करत नाहीत. पण आता ३१ मे पर्यंत योग्य नियोजन न केल्यास शांत बसणार नाही. सिडकोने गृहसंकुल उभारताना डेव्हलपमेंट चार्जेस घेतले आहेत आणि त्या अनुषंगाने पाणी, गटारे, रस्ते व तत्सम सुविधा देण्याचे कर्तव्य सिडकोचे आहे. आंदोलन केले कि तेवढ्या पुरते नियोजन होते आणि नंतर सिडको पुन्हा भोंगळ कारभार करते, हा मनमानी कारभार चालणार नाही आणि हे आंदोलन शेवटचे नाही हे याद राखा असा इशारा सिडकोला त्यांनी दिला. एसीच्या केबिनमध्ये बसून पाण्याशिवाय तडपायला सिडकोचे अधिकारी लावत आहेत, त्यामुळे आता बस्स झाले जे आंदोलन करणार त्याची तारीख जाहीर करणार नाही तर मनात येईल त्या दिवशी सिडको कार्यालयात घुसून आंदोलन करणार आहोत आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असेही त्यांनी सिडकोला ठणकावून सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!