पनवेल दि.02: (हरेश साठे) मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभरातील खासदार व आमदार यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा देत या संदर्भात शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, गणेश कडू, सुनिल पाटील, रामदास शेवाळे, प्रकाश खैरे, राजू भगत, सचिन भगत, राजू नलावडे, मनोज पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मंडळींसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सखोल चर्चा केली. आमदार प्रशांत ठाकूर नेहमी प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत असतात त्यामुळे मराठा समाजाच्या उपस्थित नेतेमंडळींनी त्याप्रती आभार व्यक्त केले. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण लावले, त्या महाराष्ट्र्रामध्ये मराठा समाजाला अशा प्रकारचा संघर्ष करावा लागणे हि आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून दुर्देवाची बाब आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या पाठिशी सर्व मराठा एक झाला पाहिजे या भावनेतून सर्व मंडळी काम करीत आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या याच आंदोलनाच्या एका भागामध्ये आज मला मनापासून समाधान आहे कि, एक लोकप्रतिनिधी नात्याने मला सुद्धा यामध्ये माझी ताकद त्याठिकाणी लावता येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या दृष्टिकोनातून जी पाऊले टाकलेली आहेत, मला वाटते अशा प्रसंगाच्या वेळेला आत्ताच्या सरकारनेही या दृष्टिकोनातून आवश्यक पाऊले उचलली पाहिजेत, असेही यावेळी बोलताना नमूद केले. 

मराठा समाजास महाराष्ट्र विधान मंडळात अंतर्गत कायदा करून आरक्षण देण्यात आले, परंतू सदर आरक्षण सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यास स्थगिती मिळाल्याने मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा व सवलतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचवेळी राज्य सरकारच्या वतीने विविध स्पर्धा परिक्षा व नोकर भरतीच्या प्रक्रिया सुरु झाल्याने मराठा समाजापुढे उभे राहिलेले प्रश्न सोडविण्याबाबत मी लोकप्रतिनिधी म्हणून याचा विधानमंडळ व आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे अभिवचन देतो. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ठरविल्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चातील तरुणांवरील गुन्हे मागे घेणे, सन २०१९ मध्ये एमपीएससी मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे, सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करणे या व अन्य मागण्या मंजूर करून घेण्यासाठी व्यक्तीशः मी व भारतीय जनता पार्टी मार्फत सर्व प्रयत्न करेन, असे आश्वासित करून मराठा क्रांती मोर्चाने या महाराष्ट्रात इतिहास घडविला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचे मराठा समाजाला मिळालेच पाहिजे, या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेचा पुनरुच्चार करतो व मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना अधोरेखित केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!