पनवेल दि.२३: अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्हयाची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलीसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत भेटवस्तूच्या आमिषाने पनवेलमधील एका महिलेची तब्बल ०३ लाख २५ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन पद्धतीने नायजेरिन सायबर गुन्हेगारांकडून एक महिन्यापूर्वी आर्थिक फसवणूक झाली होती. त्या अनुषंगाने या गुन्ह्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली. १८ पोलीस आणि सायबर तज्ञ् अशी टीम बनविण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने गुन्हेगारांचे केंद्र दिल्ली जवळ असल्याचे या टीमच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पनवेलहून हि टीम दिल्लीला रवाना झाली. त्यांनी तब्बल दहा दिवस दिल्लीमध्ये शोध मोहीम घेऊन सहा आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे हे आरोपी सर्व नायजेरियन निघाले. पोलिसांच्या या टीमने केलेल्या कारवाईने सराईत सायबर गुन्हेगार जेरबंद झाले. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे व त्यांच्या टीमचे कौतुक केले.