हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे कृती समितीचे आवाहन
पनवेल दि.६: ९ ऑगस्ट हा दिवस ‘क्रांती दिन. १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी मुंबई येथील गोवालिया टँक येथून समस्त भारतीयांना ‘अंग्रेज चले जाओ’ अशी हाक दिली. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात ‘मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल येथील पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कामगार नेते भूषण पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, संतोष केणे, सुरेश पाटील, गुलाब वझे, जे.डी. तांडेल, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, प्रत्येक मशाल ही दि. बा. पाटील यांनी दिलेल्या क्रांतीच्या लढ्याची ओळख असेल. त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या भूमिपुत्रांच्या व्यथा या मशाल मोर्चाद्वारे मांडणार आहे. आणि मशाल मोर्चात शपथ घेऊन पुढच्या तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नावाबाबत केंद्राला घाई नाही मात्र ठराविक नाव देण्याची घाई महाराष्ट्र सरकारला झाली, त्यामुळेच संघर्षाची लढाई सुरु झाली पण हि लढाई जिंकण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त मैदानात उतरला आहे. १५ ऑगस्ट सरकारला डेडलाईन दिली आहे, या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने न्याय द्यावा, अन्यथा १६ ऑगस्ट पासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल, अशी रोखठोक भूमिका मांडत कदापिही मागे हटायचे नाही, दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत हटायचे नाही, अशी गर्जनाही केली.
पत्रकारांना अधिक माहिती देताना, कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, मशाल मोर्चा हा १० व २४ जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चासाठी ज्या मशाली प्रज्वलीत केल्या जातील त्यांची सुरूवात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून म्हणजे उरण तालुक्यातील जासई येथून, महापुरुष, हुतात्म्यांना तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून करण्यात येईल. त्यासाठी ९ ऑगस्ट रोजी तेथे एक मोठी क्रांती ज्योत प्रज्वलीत केली जाईल. यावेळी कृती समितीचे सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यांतून, तालुक्यातून व विभागातून आलेले विशेष प्रतिनिधी, त्या मुख्य मोठ्या ज्योतीद्वारे आपल्या मशाली प्रज्वलीत करतील व आपापल्या ठिकाणी घेऊन जातील. त्यानंतर विशेष प्रतिनिधींनी नेलेल्या मशालीची ही क्रांती ज्योत, त्या त्या ठिकाणच्या गावागावातून आलेले प्रतिनीधी, गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावासाठी ही क्रांती ज्योत प्रज्वलीत करतील आणि गावात वा विभागात 'मशाल मोर्चा' काढतील. यावेळी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नामकरणाची प्रतिज्ञा केली जाईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अंतिम श्वासापर्यंत दिबासाहेबांनी लोकांसाठी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाची जाणिव भूमिपुत्रांना आहे त्यामुळे सरकारच्या दडपशाहीला भूमिपुत्र घाबरणार नाही, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कृती समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल यांनी सांगितले की, आज सरकार भूमिपूत्रांना सूडाची वागणूक देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे. या आंदोलनाच्या द्वारे हा संताप व्यक्त करून, दि. बा. पाटील यांनी दिलेल्या लढ्याच्या प्रश्नांना पुन्हा वाचा फोडण्यात येईल. दि. बा. पाटील यांच्या अलौकिक कार्याची प्रेरणा घेऊन, आपला नामकरणाचा लढा यशस्वी करणे, हाच हेतू ध्यानात घेऊन या क्रांतीच्या मशाली प्रज्वलीत केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.