नवी मुंबई, दि. 25 :- “माझी वसुंधरा अभियान 4.0” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व आझादी का अमृत महोत्सवांतर्गत “मेरी माती मेरा देश” अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदशन देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 28 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वा. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गाशी असलेली कटीबध्दता वृध्दिंगत करण्यासाठी निसर्गाशी संबंधित भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांना विचारात घेऊन ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यामध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० पासून राबविण्यात येत आहे. “माझी वसुंधरा अभियान ४.०” चा शुभारंभ दिनांक १५ जून, २०२३ रोजी झाला असून, या अभियानात विभागातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच सर्व ग्रामपंचायती यांनी विभागीय आयुक्त यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहभाग नोंदविला आहे. या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांना काम करण्यासाठी मिळणारा कालावधी हा १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ असा १२ महिन्यांचा आहे.
“माझी वसुंधरा अभियान 4.0” ची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने आयोजीत या कार्यशाळेस राज्य स्तरावरुन माझी वसुंधरा अभियान संचालनालय, मुंबईतील पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे अभियान संचालक सुधाकर बोबडे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उप वन संरक्षक (प्रादेशिक), सामाजिक वनिकरण विभाग, जिल्हा ठाणे व रायगड हे उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी करावयाची उपाययोजना इ. बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेसाठी विभागस्तरावरुन उप आयुक्त (विकास) व उप आयुक्त (नगरपालिका प्रशासन) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच क्षेत्रिय स्तरावरुन सदर कार्यशाळेस कोकण विभागातील महानगरपालिकेचे उप आयुक्त, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.). जिल्हा परिषद, (सर्व), गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व). मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपंचायत (सर्व) व माझी वसुंधरा अभियानाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय (सर्व) संपर्क अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सर्व नागरीकांनी हरित शपथ घ्यावी. सिंगल युज प्लास्टीकचा वापर बंद करावा, अभियानामध्ये ८५ ते २९ वयोगटातील तरुणांनी सहभागी होऊन व्हावे, तसेच सर्व सण पर्यावरण पूरक पध्दतीने साजरे करावेत. तसेच देशी वृक्षरोपणाला प्राधान्य द्यावे आणि “माझी वसुधरा अभियान ४.०” हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.