महाराष्ट्राचा 2021 चा चित्ररथ
नवी दिल्ली, 23 : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणा-या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी कँटॉन्मेंट परिसरातील राष्ट्रीय रंगशाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रजासत्ताकदिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टे दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या वारकरी संतांची थोर परंपरा दर्शविणारा चित्ररथ सादर करण्याचा निर्णय झाला आणि विभागाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सुंदर व सुबक चित्ररथ तयार केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी परिचय केंद्राशी बोलताना सांगितले.
वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रध्देविरोधात आवाज उठवत समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शविणा-या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणा-या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुट उंचीची आसनस्थ मुर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मुर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारीत ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी 8 फुट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या पाठोपाठ राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणा-या पांडुरंगाची कटेवर हात असणारी या चित्ररथावरील 8.5 फुट उंचीची लोभस मुर्ती भक्तीभावाच मुर्तीमंत रुप घेवून अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.
चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मुर्ती उभारण्यात आल्या आहेत.
या कलाकारांनी उभारला चित्ररथ
राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती नागपूर येथील टीम शुभचे रोशन इंगोले (केळझर, वर्धा) आणि तुषार प्रधान (यवतमाळ) या कलाकारांनी तयार केले आहेत. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कारागीरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.
तांत्रिक कौशल्यही आहे विशेष
या चित्ररथावर एकूण चार फिरत्या मुर्ती साकारण्यात आल्या असून त्यासाठी यवतमाळ येथील राजेश टेंभरे आणि अंकुश टेंभरे या पिता-पुत्रांनी तंत्रज्ञ म्हणून चोख भूमिका वठवली आहे. टाकावू वस्तुंचा वापर करून या पिता-पुत्रांनी चित्ररथावरील शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांच्या भेटीची मुर्ती, पांडुरंगाची कटेवर हात असलेली मुर्ती, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्या फिरत्या मुर्ती उत्तमरित्या कार्यन्वीत केल्या आहेत.
चित्ररथावर चार कलाकार देणार प्रस्तुती
वारक-यांच्या वेशात मृदंग, टाळ आणि विणाधारी चार कलाकार चित्ररथावर प्रस्तुती देणार आहेत. याशिवाय चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजुला प्रत्येकी चार कलाकार वारक-यांच्या भूमिका साकारणार आहेत. ठाणे येथील कलांकुर गृपचे 12 कलाकार या भूमिका साकारणार आहेत.
‘ विठुचा गजर…’ गीत आणि वारकऱ्यांचा नामघोष असणार आकर्षण
राजपथावरील प्रमुख पाहुण्यांसमोर चित्ररथ येताच येथे होणा-या सादरीकरणात ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हे विठ्ठलाचा महिमा सांगणारे गीत ऐकायला मिळणार आहे. यासोबत ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग-पांडुरंग’ हे वारकरी संप्रदायातील प्रसिध्द नामघोष ऐकविण्यात येणार आहेत.