दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश
दुर्घटनाग्रस्त गोविंदांना मिळणार सहाय्य

अलिबाग दि.१९: लहान मुलांपासून सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण आज साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणार्‍या दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे दहीहंडीच्या उत्सवावर आणि उत्साहावर पाणी पडले होते. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात आठ हजार 167 ठिकाणी दहीहंडी उभारण्यात येणार आहेत. त्यात एक हजार 928 सार्वजनिक, तर सहा हजार 239 खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढल्या जाणार असून या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. दहीहंडी उत्सवाला अधिक रंगत आणण्यासाठी सिने कलाकार, गायकांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सव साजरा करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी व होमगार्ड जवानांचा समावेश असणार आहे.

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीची प्रो गोविंदा स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 18) रोजी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून विजेत्यांना शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. विद्यमान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती.

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना मिळणार सहाय्य
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यानुसार गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे सहाय्य, तर जखमी झाल्यासही आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!