पनवेल दि.१९: (दा. कृ. सोमण) आज दि. १९ ॲाक्टोबर रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी आपणास कोजागरी (कोजागिरी नव्हे !) पौर्णिमा साजरी करावयाची आहे. आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. चंद्राचे ठिपूर चांदणे पडते. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह मौज मजा करता यावी त्यासाठी हा उत्सव प्रचारात आला असावा. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे, नारळपाणी देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.
कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागा आहे असे विचारते. जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.
“ को जागर्ति ? “ याचा अर्थ केवळ शारीरिकदृष्ट्या कोण जागा आहे हा नाही. तर शरीराची , घराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात , योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात , वेळ पाळण्यात, शिस्तीचे व नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे ? असा अर्थ घ्यावयाचा आहे.जो जागा असतो त्यालाच समाधानाची लक्ष्मी प्राप्त होत असते.
