मुंबई दि.६: महान गायिका, भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. संध्याकाळी साधारण सव्वासात वाजता त्यांच्यावर मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना झाले. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या सेनेच्या ट्रकमधून साधारण साडेपाच वाजता त्यांचे पार्थिव शिवतीर्थावर पोहोचले. याठिकाणी त्यांचे पार्थिव चाहत्यांसाठी दर्शनासाठी ठेवले होते. पंतप्रधानांचे शिवाजीपार्कवर आगमन झाल्यानंतर त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली. सेनेच्या तीनही दलांच्या अधिकाऱ्यांकडून दीदींना मानवंदना देण्यात आली आणि सव्वासात वाजता त्यांना मंत्रोच्चारामध्ये मुखाग्नी देण्यात आला.
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल, राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल असे नेते, तसेच सचिन तेंडूलकर, शाहरुख खान, पद्मनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर, जावेद अख्तर आदी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.