रत्नागिरी दि.२१(सुनिल नलावडे) कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात होता. त्यानुसार काल ओखावरून निघालेली पार्सल ट्रेन आज रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहचली. या ट्रेनमधून गुजरातमधून औषधांचा साठा रत्नागिरीतील मेडिकलसाठी आणला गेला. आज रत्नागिरी स्थानकावर हा माल या पार्सल ट्रेनमधून उतरवण्यात आला. रत्नागिरीला हा माल उतरवून हि ट्रेन कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर हि ट्रेन मडगाव आणि उड्डपी या स्थानकांवर थांबवणार आहे. हि ट्रेन तिरूअनंतपुरमपर्यंत धावणार आहे. इथं पोहचल्यानंतर हि ट्रेन पुन्हा २४ एप्रिलला तिरुअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उड्डपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे. दरम्यान परतीच्या वेळी रत्नागिरीतून किमान 2 हजार पेट्या आंबा या स्पेशल पार्सल ट्रेनमधून जाईल असा अंदाज कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.