रत्नागिरी दि.26: कोकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वे स्थानकात नवीन लूपलाईन टाकण्यासाठी शुक्रवार दिनांक २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेआठपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे निवसर ते विलवडे स्थानकांच्यादरम्यान ८ तास वाहतूक बंद राहणार आहे. त्याचा परिणाम आठ तासांच्या कालावधीत रत्नागिरी ते राजापूरमधून पुढे जाणाऱ्या १० गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गाचे तत्काळ दुपदरीकरण शक्य नसल्यामुळे विविध स्थानकांवर गाड्यांचे क्रॉसिंग एकाचवेळी करण्याच्या दृष्टीने प्रशासन पावले उचलत आहे. आतापर्यंत रोहा ते ठोकूरपर्यंत अकरा स्थानकांवर नवीन लूपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. विलवडे ते निवसर या सुमारे २५ किलोमीटरच्या टप्प्यात रेल्वे क्रॉसिंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. दोन्हींमधील आडवली स्थानकात मुख्य लाईन आणि एक लूपलाईन आहे; परंतु एखादे इंजिन त्या ठिकाणी आले की, मुख्य लाईनच वाहतुकीसाठी खुली राहते. या स्थानकाची वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी कोरे प्रशासनाने दुसरी नवीन लूपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे अंतिम टप्प्यातील काम २७ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी रात्री २३.४५ पासून हा मार्ग बंद केला जाईल. हे काम सकाळी पावणेआठ वाजता संपेल, असा अंदाज आहे. मेगाब्लॉकमुळे मुंबई – मंगलुरू एक्स्प्रेस, गांधीधाम – नागरकॉइल एक्स्प्रेस, कोचुवेली – डेहराडून एक्स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम – हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव डबलडेकर, कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस, मडगाव – रत्नागिरी आणि रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर या दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.