पनवेल दि.१४: विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेच्या समोर उभे राहून ठेवीदारांना एक महिन्याच्या मुदतीत पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्या मुदतीत पैसे द्यावे, त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे खुले आव्हान आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी ठेवीदारांच्या संमतीने व साक्षीने आज दिले.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेने घोटाळा केल्याचे उघडकीस झाल्याने खातेदार, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढतच आहे. या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार व खातेदारांना पैसे मिळत नाही, त्यासंदर्भात ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्केट यार्ड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मार्गदर्शन करताना जो पर्यंत ठेवीदारांना त्यांचे पसे परत मिळत नाही, तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासित केले. यावेळी ठेवीदारांनी कर्नाळा बँकेकडून स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने संघटित होण्याचा निर्धार करतानाच कर्नाळा बॅंकचे बोगस कारभाराचे धिंडवडे काढले. बँक घोटाळ्यामुळे आतापर्यंत १८ खातेदारांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे खारघरच्या एका ठेविदाराने धक्कादायक माहिती यावेळी बोलताना दिली. यावेळी दोन्ही आमदारांनी बोलताना, पैसे मिळवून देण्यासाठी आमचे प्रमाणिक प्रयत्न आहे, तुमची साथ संघटितपणे आम्हाला हवी आहे तरच हा प्रश्न सुटणार आहे. तुमच्यासाठी आम्ही लढतोय पण या लढाईला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे, यामध्ये आमचा कोणताही राजकीय हेतू नाही तर फक्त ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळावे हाच शुद्ध हेतू आहे, असेही नमूद केले. या बैठकीस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,तालुका सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, माजी नगरसेवक अजय कांडपिळे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे यांच्यासह ठेवीदार शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.