पनवेल दि.३: ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेला निर्देश देण्याबरोबर या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहे. त्यामुळे ठेवीदार संघर्ष समितीने उभारलेल्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरु आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकाऱ्यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत, यासाठी आज प्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट सोमैय्या, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आरबीआय वर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात शेकडो ठेवीदार व खातेदारांनी कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळ आणि आरबीआयच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. आरबीआयने कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाच्या संपत्ती जप्त करून पैसे द्या अशी जोरदार मागणीही त्यांनी यावेळी करत आमच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे आम्हाला द्या, असा टाहो त्यांनी फोडला. ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रशासन असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार चिंतेत आहेत, त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रीयपणे कार्यरत आहेत मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिनधास्त उत्तरांची टोलवाटोलवी करत आहे. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची चिंता वाढू लागली आहे. गोरगरिबांनी जागा जमीन विकून आपल्या कष्टाची आयुष्याची पुंजी स्थानिक बँक म्हणून कर्नाळा बँकेत जमा केली. परतावा म्हणून त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते मात्र बॅँकेतीलच मंडळींनी घोटाळा करून सर्वसामान्य माणसाचा पैसा हडप केला. त्यामुळे अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती ग्राहकांची झाली आहे. दरम्यानच्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन ८४० ठेवीदारांचे तक्रारी अर्ज सादर केले व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याचे निर्देश कर्नाळा बँकेला देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर आरबीआयने समाधानकारक कार्यवाही न केल्याने धरणे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. या तीव्र आंदोलनाची दखल आरबीआयला घ्यावी लागली. त्यानुसार आरबीआयच्या महाप्रबंधक रिना बॅनर्जी यांनी त्यांच्या दालनात शिष्टमंडळाशी चर्चा केली. माजी खासदार किरीट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी ठेवीदारांच्या व्यथा मांडून त्यांना कर्नाळा बँकेकडून त्यांच्या कष्टाचे व हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी आग्रही मागणी केली. या सर्व प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक तात्काळ पावले उचलणार असल्याचे रिना बॅनर्जी यांनी आश्वासित केले. त्यानुसार येत्या पंधरा दिवसात हि कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले. यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला असून ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी ठेवीदारांना व या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, उरणचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, चंद्रकांत घरत, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, प्रविण पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कुंडलिक काटकर, प्रभाकर आघारकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!