नेरे, दिघाटी, चिंध्रण ग्रामपंचायत राखण्यातही भाजपला यश
पनवेल दि.२०: तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील करंजाडे, शिवकर, भाताण ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. एकूणच या निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
पनवेल तालुक्यातील करंजाडे, शिवकर, भाताण, नेरे, चिंध्रण, केळवणे, कानपोली, दिघाटी, शिरढोण, नितळस या दहा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल आज पनवेल तहसिलदार कार्यालयात जाहीर झाला. करंजाडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी मंगेश शेलार, शिवकर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच म्हणून आनंद ढवळे, भाताण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी तानाजी पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी प्रकाश घाडगे, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी एकनाथ पाटील, आणि दिघाटी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी रजनी ठाकूर विजयी झाले. शिवकर ग्रामपंचायतीत तर भाजपने शेकापला व्हाईट वॉश देऊन पराभवाची धूळ चारली. करंजाडे ग्रामपंचायतीत ११ पैकी १० जागा जिंकून भाजपने शेकापला मोठा सुरुंग लावला. चिंध्रण ग्रामपंचायतीत ०५, नितळस मध्ये ०३, नेरे मध्ये ६, भाताण ०२, शिरढोण ०३, कानपोली ग्रामपंचायतीत ३ जागा जिंकल्या. या निवडणुकीतही भाजपने सरस कामगिरी करत शेकाप महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावले.
यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शशिकांत शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, युवा नेते विनोद साबळे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांताराम मालुसरे, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, आत्माराम हातमोडे, युवा नेते अविनाश गाताडे, डॉ. संतोष आगलावे, प्रकाश खैरे, प्रभाकर जोशी, निर्दोष केणी, रविंद्र पाटील, वासुदेव गवते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!