पनवेल दि.४: ज्येष्ठ नागरिक संघात नुकतेच नसिमा फाउंडेशन, गजल ग्रुप आणि कोकण मराठी साहित्य परिषद, पनवेल शाखेच्या वतीने सहा पुस्तकांचे प्रकाशन झाले. यानंतर रंगलेल्या गजल मुशायर्यात मान्यवर गजलकारांनी आपल्या गजल सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी गजल एके गजल हा संपादक रोहिदास पोटे, तसेच सहसंपादक संदीप बोडके यांनी संपादित केलेला ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त निर्मित गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्याचबरोबर गणेश म्हात्रे यांचे मन ओथंबुन आले हा कवितासंग्रह, वाय. के. शेख यांचा चांदणफुले हा कवितासंग्रह, डॉ. बाळासाहेब लबडे यांचा एक कैफियत हा गजलसंग्रह, डॉ. राम पंडित यांचा मात्रिक छंद, ए. के. शेख आणि प्रा. फातिमा मुजावर या गुरुशिष्य जोडीचा मोरपंखी गजल हा तरही गजलसंग्रह ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक जे. एम. म्हात्रे, तसेच माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला उपस्थित होते. वक्ते म्हणून दिवाकर वैशंपायन, प्रा. एम. एम. कांबळे, रोहिदास पोटे, मीनल वसमतकर, डॉ. मनीषा बनसोडे, डॉ. अविनाश पाटील यांनी प्रकाशित पुस्तकांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले, तसेच सर्वांना सोप्या शैलीत पुस्तकांची ओळख करून दिली. चिपळूण येथील शाहीर खेरटकर यांनी ए. के. शेख रचित पनवेलचा पोवाडा सादर करून कार्यक्रमात बहार आणली. यावेळी रंगलेल्या गजल मुशायर्यात डॉ. सुभाष कटकदौंड, पूजा नाखरे, रंजना करकरे, ऍड. माधुरी थळकर, डॉ. सामिया शेख, आबिद मुनशी, समीर शेख, प्रमोद खराडे, स्मिता हर्डिकर यांनी आपल्या गजल सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शेख यांनी केले, तर आभार ऍड. माधुरी थळकर यांनी मानले.