अलिबाग दि.२१: कर्जत येथील पत्रकार अजय गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज रायगड प्रेस क्लबच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात आले.
पत्रकारांच्या शिष्टमंडळाने रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेतली. आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याला न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन अशोक दुधे यांनी दिले. पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर पत्रकारांनी उपोषण मागे घेतले.
15 फेब्रुवारी रोजी नेरळ येथील पत्रकार अजय गायकवाड यांना बातमी देण्याच्या रागातून नेरळ येथील वाल्मिकी नगर येथील तरुणाने मारहाण केली होती. या गुन्ह्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात त्यादिवशी घेतली आहे. मात्र आरोपीला पोलिसांनी त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे लक्षणिक उपोषण करण्यात आले होते.
रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत राजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, कार्याध्यक्ष मनोज खांबे, माजी अध्यक्ष विजय मोकल, माजी अध्यक्ष अनिल भोळे, माजी अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष अभय आपटे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार लावंत वालेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील, दरवेश पालकर, अजय गायकवाड आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.