पनवेल,दि.16: गरोदर मातांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत सर्व नागरिकांना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता रात्री 10 वाजेपर्यंत आरोग्य सेवा मिळणार आहे. यासाठी महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक वैद्यकिय अधिकारी, एक लॅब टेक्निशियन,एक फार्मासिस्ट, एक परिचारिका ,एक हाऊसकिपींग असा पाच कर्मचाऱ्यांचा स्टाफ नव्याने भरती केला आहे. आज या नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रातील कामाची माहिती देण्यासाठी मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकित उपायुक्त सचिन पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजपासून सुरूवातीला सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. येत्या काळात सर्वच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत एनयुएचमच्या माध्यमातून ओपीडी चालविली जाईल व दुपारी 2 ते रात्री 10 नव्याने भरती केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ओपीडी चालविली जाणार आहे.
महापालिका प्राथमिक आरोग्य केद्रांच्या माध्यमातून ओपीडी सेवेमध्ये डॉक्टर तसेच विशेषतज्ञांकडून आरोग्य सल्ला, प्राथमिक आरोग्य उपचार, आपत्कालीन सेवा, संसर्गजन्य रोग उपचार, असंसर्गजन्य रोग उपचार, उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी व प्रतिबंध नियंत्रण, ताप दवाखाना, प्रसुतीपूर्व सेवा, नवजात शिशुंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, नियमित लसीकरण, कोविड लसीकरण, समुपदेशन सेवा देण्यात येतात.तसेच नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना राबविली जाते. याचबरोबर औषध सेवाही पुरविली जाते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!