ठाणे दि.५: यावर्षी कोरोनामुळे मुंबईच्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळांने गणेशमूर्तीची स्थापना व उत्सव न करता रक्तदान, आरोग्योत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे हा निर्णय अतिशय योग्य असल्याचे पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, अडचणींमुळे एखाद्यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशस्थापना व पूजा करता आली नाही तरी शास्त्रीय दृष्टीने त्याला दोष नाही. परंपरा खंडीत होऊ नये असे गणेशभक्तांना वाटणे सहाजिक आहे.
तरी यावर्षी परिस्थिती अडचणीची आहे हेही समजून घ्यायला पाहिजे. दरवर्षी गणेशचतुर्थीला गणेशस्थापना व पूजा करायलाच पाहिजे असे कुठल्याही मान्यवर ग्रंथामध्ये लिहीलेले नाही. यावर्षी करोनामुळे इतर गणेश मंडळानीही असा निर्णय घेतला तरी तो आजच्या परिस्थितीनुसार योग्य ठरेल.
यावर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी अडचणींमुळे कोणाला घरगुती गणेशमूर्तीची स्थापना व पूजा करणे शक्य नसेल तरीही हरकत नाही. दरवर्षी गणेशस्थापना व पूजा केलीच पाहिजे असे नाही. तसेच गणेशपूजेमध्ये जे उपचार उपलब्ध होतील ते गणेशाला अर्पण करावेत. नाहीतर अक्षता अर्पण कराव्यात. देव हा कधीही कोणावरही कोपत नसतो.
तो कृपाळूच असतो. श्रद्धा व भक्ती हीच महत्त्वाची असते. यावर्षी करोनामुळे जाणे येणे, प्रवास करणे कठीण आहे. गर्दी टाळणे खूप आवश्यक आहे. माणसाचे आरोग्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी सर्वांनी शिस्तपालन करणे आवश्यक आहे असेही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले!

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!