पनवेल दि.४: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी उभारण्यात येत असलेल्या लढ्याला रायगड पासून मुंबई पर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहरात, गावांमध्ये विभागनिहाय बैठका होत आहे. त्यामुळे आंदोलनांची तीव्रता या बैठकीमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यावेळी लढ्यातील रक्तरंजित झेंड्याचे अनावरण करण्यात आले.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी १० जूनला मानवी साखळी आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने नियोजनासंदर्भात आढावा बैठक गुरुवारी सायंकाळी पनेवल येथील आगरी समाज मंडळच्या सभागृहात पार पडली. या बैठकीस लोकनेते दि.बा.पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जे. डी. तांडेल, कॉ. भूषण पाटील, दिपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, अँड.मदन गोवारी, गुलाब वझे, संतोष केणे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राजेश गायकर, कामगार नेते सुरेश पाटील, शेकापचे नेते मेघनाथ तांडेल, यांच्यासह रायगड, नवी मुंबई, ठाणे, कल्याण व मुंबई मधील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळाला दि. बां. चेच नाव मिळावे, अशी भावना रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई मधील भूमिपुत्र व्यक्त करत आहे. तर विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा घाट सरकार स्तरावर रचला जात आहे. मात्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड पासून मुंबईपर्यंत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नावाला समर्थन देण्यासाठी चळवळ उभारली जात आहे. त्यासाठी आता विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक रूप धारण करत आहे. येत्या १० जूनला रायगड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पालघर, अंबरनाथ, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, मुंबई या ठिकाणी मानवी साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. हे आंदोलन झाल्यानंतर २४ जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी हा लढा अधिक व्यापक करून सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्याचीही तयारी या बैठकीतून पहायला मिळाली.
आंदोलनासाठी कामोठेकरांचा समर्पण निधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला कामोठे ग्रामस्थांच्या ३६४ कुटुंबांनी प्रत्येकी १ हजार रूपये जमा करून ०३ लाख ६४ हजार रुपये समर्पण निधी दिला आहे. कामोठे ग्रामस्थांनी केंद्रीय कृती समितीस हा धनादेश सुपूर्द केला
यामागील उद्दिष्ट सांगताना कामोठे ग्रामस्थ पंच कमिटीने यावेळी सांगितले कि, गावातील ज्या ३६४ कुटूंबानी ७० च्या दशकात लोकवर्गणी जमा करून व स्वतः श्रमदान करून आपल्या लाडक्या लोकनेत्यास अर्थात दिबांना त्यांचे घर बांधून दिले होते. त्याच ३६४ कुटूंबांनी आजही दिंबावरील प्रेम व्यक्त करताना घरटी ०१ हजार समर्पण निधी या आंदोलनास दिला आहे, असे नमूद केले. या बैठकीत भारत मुक्ती मोर्चा व त्यांच्या संलग्न ६८ संघटनांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.