पनवेल दि.०१ रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ते अपघातातील कायदे कठोर करून चालकाला सात लाखांचा दंड, १० वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदा कठोर केल्याच्या निषेधार्थ कळंबोली सर्कल, बिमा कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी रस्ते अडवून चालकांनी महामार्गांवरील वाहतूक बंद केली. चालकांनी उस्फुर्तपणे अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले.
महामार्गांवर अवजड वाहनांकडून अपघात झाला आणि चालक पळून गेला तर चालकाला ७ लाख रूपयांचा दंड आणि १० वर्षांची शिक्षा असा बदल करण्यात आला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
दोन दिवसांपुर्वी तळोजा एमआयडीसीतील अवजड वाहनचालकांनी आंदोलन केल्यानंतर कळंबोली स्टिल मार्केट, भारतीय कपास निगम, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी परिसरातील वाहनचालकांनी आज सकाळी वर्षांच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर येवून संताप व्यक्त केला. शेकडोंच्या संख्येने वाहनचालक अचानक रस्त्यावर येवून महामार्ग बंद करू लागल्यामुळे पोलिस यंत्रणा जागी होण्यापुर्वीच रस्ते बंद झाले होते. अर्धां तासानंतर पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचल्यानंतर महामार्ग सुरूळीत झाला.