रत्नागिरी दि.29 (सुनील नलावडे) वाढता उन्हाळा. उकाडा आणि घामाच्या धारा. त्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या जनतेला वरूनराजाने काहीसा दिलासा दिला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. राज्यातील काही ठिकाणी हलका, मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने आगोदरच व्यक्त केली होती. राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पालघर रायगड आणि कोकणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, आज दुपारनंतर राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घराचे छप्पर, पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला.
कर्जत खोपोली येथे वादळी वारा व पावसाने घरांचे मोठे नुकसान केले.
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात चिपळूण परिसरातील बहुतांशी गावात मुसळधार पाऊस झाला.
या महिन्यात सलग तिसऱ्यांदा अवकाळीचा तडाखा झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.
अवकाळी झालेल्या पावसामुळे परशुराम घाटात माती रस्त्यावर येऊन कंटेनर त्या मध्ये रुतल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग वाहतूक ठप्प झाली होती.
