पनवेल: दि.१२: पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना पनवेल जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना सचिव संजय मोरे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 1200 नागरिकांनी लाभ घेतला. व 600 नागरिकांना मोफत चष्मे वाटप केले. विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व प्रकारच्या आजारावर रुग्णांची तपासणी व निदान करण्यात आले. निदान झालेल्या रुग्णांना त्वरित मोफत औषधे देण्यात आली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत किवा धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दरात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली. या महाआरोग्य शिबीरात सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, स्त्रीरोग,मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, मूत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह, श्वसनाचे विकार, कान, नाक, घसा, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अॅपेंडिक्स, स्त्री रोग उपचार, बालहृदयविकार अशा विविध आजारांची तपासणी विनामूल्य करण्यात आली. शिबिराचे आयोजन पनवेल शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख व शिवसैनकांनी शिबिराचे नियोजन केले. तर शिबीर यशस्वी करण्यासाठी कळंबोली येथील शिल्पा मेडिकल, कामोठा येथील एमजीएम हाॅस्पिटल व ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय कळवा ठाणे या नामांकित हॉस्पिटल्स व डॉक्टर्स संघटना यांनी मोलाची साथ दिली. या कार्यक्रमाला मा.नगरसेवक राजू शर्मा,बबन मुकादम, अमर पाटील, सुनिल गोवारी, शिवाजी थोरवे,प्रसाद परब, श्रीकांत फाळके, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, सिद्धेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.