अलिबाग दि. ४ जून- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपारिक नियम डावलून कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सकाळी जिल्हधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासमवेत शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्‍यानंतर दरेकर नुकसानग्रस्‍त भागाला भेट देवून पाहणी केली.
जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जागा, शेती, घरे, बागा आदींचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासकीय स्तरावर लवकारात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा व तातडीने शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहचविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी चक्रीवादळाच्या तडाख्यात उमटे गावामधील मृत्युमुखी पडलेल्या दशरथ वाघमारे यांच्‍या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्‍वन केले व त्यांची विचारपूस केली. कालच्या चक्रीवादळाच्या तडाख्यात झाडांची पडझड झाली असून इमारती तसेच घरांचे छप्पर उडाले आहेत. दरेकर यांनी त्या नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. तेथे मदतकार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या टीमची भेट घेतली, त्यांच्याकडून सुरु असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या चेऊल या गावालाही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी भेट दिली. चक्रीवादळामुळे शेती तसेच सुपारी व नाराळाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून त्याठिकाणी जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या सोबत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, भाजपचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!