पनवेल दि.०८: प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे, त्यामुळे स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे केले.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व पनवेल मिडीया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्तृत्ववान ७० महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार, साहित्यिक निला उपाध्ये, सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात वैद्यकीय, वकील, नाट्य-सिने, राजकीय, स्वच्छता दूत, नर्स, समाजसेवा, साहित्य, शिक्षक, एस.टी.वाहक, रिक्षा चालक, पिग्मी एजंट आदी क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले कि, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकारण, औद्योगिक, अशा विविध क्षेत्रात महिलांची कामगिरी उंचावत आहे. हि जबाबदारी पार पडताना त्यांनी कुटुंबाची जबाबदारी झटकली नाही. त्यामुळे समाजाच्या उद्धारासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा वारसा जपण्याचे काम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आज कुठल्याही क्षेत्रात पाहिले तर महिला अग्रस्थानी राहिल्या आहेत. त्यामुळे महिलांनी मागे राहण्याची गरज नाही तर पुढे आले पाहिजे, असे सांगतानाच वेळ पडल्यास कुटुंबाला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या रणरागिणीही होतात,असेही म्हंटले. यावेळी त्यांनी सत्कारमूर्ती ब्रह्मकुमारी तारादीदी यांचा उल्लेख करत दीदीं दरवर्षी मला आवर्जून राखी बांधत आशिर्वाद देत असून त्यांचे मला मार्गदर्शनही लाभते, अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून महिलांप्रती असलेला आदर व्यक्त केला. तसेच त्यांनी सर्वाना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी म्हंटले कि, महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली ताकद हि समाजाला ऊर्जा देणारी आहे. महिलांना नेहमीच कुटुंबाची काळजी असते पण तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. स्वतः सक्षम झाली पाहिजे आणि प्रत्येक महिलेने स्वतःसाठी आधी जगायला शिकले पाहिजे तरच आयुष्याची भूमिका यशस्वी होण्यास मदत होईल, असे नमूद केले.
ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी म्हंटले कि, सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला त्यामुळे आपण सुशिक्षित झालो. महिलांना कधीही घर सुटत नाही. प्रधान पुरुष मानसिकता बदलण्याची गरज आहे म्हणूनच महिला दिन साजरा करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद करून लोकनेते रामशेठ ठाकूर सज्जन व्यक्तिमत्व असल्याने ते सर्व समाज आणि महिलांच्या पाठीशी सदैव ताकदीने उभे राहतात, त्यांच्या कार्याचे कौतुक आणि आभार मानू तेवढे कमी आहेत. महिलांच्या मुठीत ताकद आहे त्यामुळे महिलांनी समाजात वावरताना अधिकाराने आणि जागरूकतेने वावरले पाहिजे, अशा शब्दात नीला उपाध्ये यांनी महिलांच्या मनात त्यांच्या लेखणीप्रमाणे ठसा उमटविला.
उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी आपल्या तडाखेबाज भाषणात सांगतले कि, महिला सक्षम करण्याचे काम होत असताना राज्य सरकारमधील मंत्री बलात्कार आणि आत्मह्त्या करण्यास महिलांना प्रवृत्त करीत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषी नराधमाला शिक्षा होण्याऐवजी गृहखाते शांत बसला आहे, अशा घटना झाल्या तर महिला कशा सक्षम होतील असा सवाल उपस्थित करून महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिलेल्या चित्रा वाघ अन्यायाविरोधात लढत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलीस करत आहे मात्र बलात्कार, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधमाला मोकाट सोडले जात आहे, हा कुठला न्याय चालला आहे असे अधोरेखित करतानाच राज्य सरकारच्या कारभाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच कुठलाही प्रसंग येऊ द्या आत्महत्या करू नका, अन्याय होऊ नये यासाठी जागरूक रहा, असे आवाहनही सायली म्हात्रे यांनी महिलांना केले.
यावेळी सत्कारमूर्ती म्हणून बोलताना, महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर विश्वास दाखविला त्यामुळेच मी महापौर झाले, असे सांगत यापूर्वी आपल्याला राजकारण क्षेत्राचे काहीच ज्ञान नव्हते अशी प्रामाणिक कबुली देऊन कुठलेही क्षेत्र असो त्यात बेस्ट करायचे मनाशी ठरवले म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना विकासकामे कशी करतात याची शिकवण मिळाली, असे आवर्जून सांगितले.
यावेळी कवियत्री ज्योत्स्ना रजपूत यांनी ‘मुली’ या शिर्षकाखाली कविता सादर करून वातावरण निर्मिती केली. या सोहळ्याचे प्रास्ताविक पनवेल मिडीया प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार गणेश कोळी यांनी केले.
सत्कारमूर्ती –
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, डॉ. अरुणा पोफरे, सिने नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, ऍड. शुभांगी झेमसे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका विद्या गायकवाड, ब्रम्हकुमारी तारादीदी, सुनिता जोशी, बिना गोगरी, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, माजी नगरसेविका नीता माळी, डॉ. जयश्री पाटील, वाहतूक पोलीस साधना पवार, विजया कदम, मोनिका वानखेडे, स्वप्नाली म्हात्रे, अश्विनी बाविस्कर, श्वेता भोईर, सुरेखा राणे, केशर पाटील, मालती म्हात्रे, रंजना माने, वनिता माने, शालिनी गुरव, ललिता राऊत, डॉ. समिधा गांधी, पद्मावती गायकवाड, मीनल साळवी, शमीम चौधरी, अनघा तांबोळी, ज्योती वाहुळकर, शैला आंबेकर, सुनिता शिंदे, प्रभावती गायकवाड, बबिता बैद, छाया चित्रे, ज्योत्स्ना रजपूत, सुनिता रामचंद्र, डॉ. रेहना मुजावर, डॉ. मनिषा चांडक, संगीता पाटील, सुप्रिया दिघोडकर, सायली काटकर, सुरेखा पानधरे, गीता कुळकुळे, सुप्रिया परब, डॉ. पदमिनी येवले, दक्षता पाटील, सुप्रिया वराडकर, तेजस्विनी नाईक, स्वराली मांजरेकर, सविता पिल्ले, सारिका मानकामे, मेघना कदम, भारती पवार, डॉ. दिपाली माने, संगिता नितीन जोशी, योगिनी वैदू, ज्योती भोपी, मनिषा सावंत, प्रतिभा मंडले, प्रा. जयश्री शिर्के, सविता वाघमारे, सुनिता पनवेलकर, कल्पना कोनकर, वनिता गुडे, उमा देसाई, स्नेहल माळी.