सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गुरव कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत
पनवेल दि.17: कोरोना योध्दा म्हणून जबाबदारी पार पाडताना सुरेश गुरव यांचे नुकताच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत गुरव कुटुंबाला केली.
सदरचा धनादेश सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून मनुष्यबळ कमी असल्याने पडेल ते काम करणारे पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई सुरेश गुरव या करोना योद्ध्याची कोरोनाशी सुरू असलेली लढाई संपली. ते कोरोनाबाधित झाल्याने दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण रुग्णालयापासून ते उपजिल्हा रुग्णालय सुरू होईपर्यंत त्यांनी पनवेलमध्येच पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. शिपाई पदावर असूनही रुग्णसेवेसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने गुरव हे रुग्णसेवा देण्यासाठी हिरिरीने पुढे येत असत. पनवेलमधील साई नगर परिसरात ते कुटुंबासोबत राहत होते. ४ सप्टेंबरला त्यांना करोनाची लक्षणे जाणवल्यानंतर काही दिवस उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईच्या सेव्हनहिल रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दानशूर नेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचा सामाजिक सेवेचा वसा कायम ठेवत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरव कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत करून नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपली.