पनवेल दि.13: ‘एसएमए टाईप १’ या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. सदरचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते वेदिकाच्या पालकांकडे आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते राजेश भालेकर उपस्थित होते.
वेदिका पुणे जिल्हयातील भोसरी येथील असून तिचे वय अवघे ८ महिने आहे. या लहान वयातच तिला ‘एसएमए टाईप १’ या गंभीर आजराने ग्रासले आहे. १० हजार मध्ये एक बालकावर या आजाराचा परिणाम होतो. या आजारामुळे मेरुदंडातील स्नायूंच्या एंट्रॉफी सर्वात तीव्र आणि जलद स्वरूपाने वाढतात. या आजारात बाळाच्या नसा व स्नायूंवर आक्रमण होते. त्यामुळे श्वासापासून बाकी क्रिया खूप कठिण जातात. वेदिकावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गंभीर आजाराचा उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेदिकाच्या आईवडिलांनी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत यांनी वेदिकाच्या उपचारासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत दिली आहे.