माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी
पनवेल दि.१६: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात १०० टक्के सुट मिळावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, खारघर भाजपचे कार्यकर्ते किरण पाटील, कर्नल अमरजित सिंग वाधवान, कमांडर पुरणचंद चौधरी, शिवप्रसाद थपलियाल, गाजे सिंग, माजी सैनिक विजय जगताप, समीर दुंदरेकर आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, भारत देशाच्या संरक्षणाकरीता सैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्याच धर्तीवर सैनिक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना आपल्या समाजात योग्यतो सन्मान मिळावा या हेतून आपण प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेहमीच त्यांचा गुणगौरव करीत असतो. मात्र काही माजी सैनिकांची आर्थिक परिस्थीती पाहता त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना राष्ट्र कर्तव्य पार पाडल्या बद्दल आपल्या पनवेल महानगरपालिकेमार्फत आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात १०० टक्के सुट दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल व यशस्वीरित्या राष्ट्र कर्तव्य पार पाडल्याने त्यांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळेल, त्यामुळे या विषयाचे महत्व लक्षात घेता पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना महानगरपालिकेमार्फत आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात १०० टक्के सुट देण्याकरीता योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असे अधोरेखित करून आग्रही मागणी केली आहे.

सदरच्या मागणी संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करणार आहोत. तसेच खारघर, पनवेल, कळंबोली, कामोठे आदी नोड निहाय कॅम्प लावून संख्यात्मक माहिती घेणार आहोत. - आयुक्त गणेश देशमुख

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!