पनवेल दि.9: स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली, अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहताना केले.
कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉक डाऊन परिस्थितीमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानावरून संस्थेच्या नवी मुंबई व पनवेल परिसरातील विद्यालय शाखांमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून कर्मवीर अण्णांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी सोशल डिस्टस्टिंग नियमांचे पालन करून पनवेल शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, माजी सचिव व महात्मा फुले महाविद्यालय पनवेलचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, मॉडर्न स्कुल वाशीच्या प्राचार्या सुमित्रा भोसले, गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या साधना खटावकर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कुलच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, संस्थेचे सहाय्यक इन्स्पेक्टर शहाजी फडतरे, पीआरओ बाळासाहेब कारंडे आदींसोबत संवाद साधला.