अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचा कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
डोंबिवली दि.११ :लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. त्यामुळे दि. बा. पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने आपले मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच द्यावे, हीच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केले. अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने आज कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यानंतर डोंबिवली येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल पाटील यांनी हे आवाहन केले.

यापूर्वीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायला ते तयार नव्हते. त्यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी नाईलाजाने घाईघाईत मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला, मात्र त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच त्यांनी हा ठराव विधानसभा आणि विधानपरिषदेत बहुमताने मंजूर करून घेतला आणि केंद्राकडे पाठवला. आता केंद्र सरकारही याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे सदस्य, आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच फक्त विमानतळच नव्हे, तर कोकण पट्ट्यातील आमचे सगळे प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आज डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीला उभे असताना आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली.

आगरी समाजाला एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बळ मिळाल्याचेही ते म्हणाले. तसेच आमचा आगरी समाज म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांना भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष अतुल पाटील, आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, गुलाब वझे, विनोद म्हात्रे, दशरथ भगत, बंडू पाटील यांच्यासह आगरी समाजातील मान्यवर आणि नेते उपस्थित होते. आगरी समाजाच्या पाठिंबामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास याप्रसंगी आगरी समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!