महापालिकेचे 2291 कोटी 41 लाखाचे अंदाजपत्रक जाहीर
पनवेल,दि.21: पनवेल महानगरपालिकेचे सन 2023-2024 चे 2291 कोटी 48 लाखाचे वस्तुनिष्ठ , विकासाभिमुख अंदाजपत्रक आज मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्त केले. महापालिकेच्या या अंदाजपत्रकांमध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा ज्यामध्ये मुख्यत्वे आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, झोपडपट्टी पुर्नविकास अशा विविध सुविधांवरती भर देण्यात आला आहे.
यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपसंचालक (अ.का) नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, उपअभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आंनद गोसावी, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा परिक्षक विनयकुमार पाटील, लेखाधिकारी डॉ संग्राम व्होरकाटे, नगरसचिव तिलकराज खापर्डे, अधिकारी उपस्थित होते.
या अंदाजपत्रकामध्ये पायाभूत सुविधांमध्ये आरोग्य विषयावरती भर देण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरीकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी 450 खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय “हिरकणी” या नावाने प्लॉट नं. 8 अ, 8 ब, सेक्टर 18, पनवेल (प.) येथिल 8000 चौरस मीटरच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या सात मजली रूग्णालयाच्या बांधकामाकरिता अंदाजित रु. 225 कोटी खर्च अपेक्षित आहे. या रुग्णालयात बाहयरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, एक्स-रे विभाग, रक्तपेढी, शवागृह व समुपदेशन विभाग अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध असणार आहेत.

• संसर्ग आजारासाठी इन्फेकशीयस लॅब
कोरोना काळात सुरु करण्यात आलेली पालिकेची स्वत:ची MOL Expert, कोळीवाडा, पनवेल या नावाने ओळखलेली आरटीपीसीआर लॅबचे संसर्ग आजारासाठी इन्फेकशीयस लॅब मध्ये रुपांतर करण्यात येत आहे. याकरिता अंदाजित रु. 2 कोटी खर्च अपेक्षित आहे. या लॅबमधुन जनतेसाठी मोफत रोगनिदान चाचण्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

• नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
पनवेल महानगरपालिकेकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नव्याने 09 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता प्राप्त झालेली असुन प्रती नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी अंदाजित रु. 2.25 कोटी खर्च अपेक्षित असुन त्याकरिता रु. 20 कोटीची आर्थिक तरतुद करण्यात आलेली आहे.

• शहरी समुदाय आरोग्य केंद्र
पनवेल महानगरपालिकेच्या नागरीकांना आंतररुग्ण सेवा तसेच महिलांकरिता प्रसूती सेवा सुविधा उपलब्ध करुन देणेकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 50 खाटांचे 02 शहरी समुदाय आरोग्य केंद्राकरिता मान्यता प्राप्त झाली आहे.

मोबाईल मेडिकल युनिट:
शहरातील झोपडपट्टी भागात व आरोग्य केंद्रापासुन दुर असलेल्या भागामध्ये फिरत्या वाहनाद्वारे नागरीकांना प्राथमिक, उपचारात्मक आणि संदर्भ आरोग्य सेवा नियमितपणे व मोफत पुरविणेकामी पनवेल महानगरपालिका स्तरावरुन 04 मोबाईल मेडिकल युनिट प्रस्तावित असुन त्याकरिता रु. 1 कोटींची आर्थिक तरतुद करण्यात आलेली आहे.

भविष्यकालीन शैक्षणिक दृष्टिकोन :
पनवेल महापालिकेचा इंग्रजी माध्यम शाळेचा ज्युनिअर केजीचा वर्ग गतवर्षी सुरू करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून महापालिकेने पहिली ते पाचवी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी हे नियोजन पूर्ण होणार आहे. शहरातील दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पहिले ते पाचवी वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तसेच भविष्यात पाचीवी पुढीलही वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.

पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा :
पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 106 कोटी व शासन पुरस्कृत अमृत व स्वच्छ भारत योजना अंतर्गत 131 कोटी रूपयांचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. गावठाण क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 106 कोटी व रस्त्यांचे काँक्रीटीकरणव डांबरीकरण यासाठी 164 निधी देण्यात आला आहे.

झोपडपट्ट्याचा पुर्नविकास :
शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे या हेतुने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत झोपडपट्टी पुर्नविकासाठी 200 कोटीचा भरीव निधीची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.

घनकचरा संकलन :
शहर सुशोभिकरणाबरोबरच घनकचरा संकलन व त्यासाठी लागणारी सामुग्री, वाहने , मनुष्यबळ यासाठी 117 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.

आरोग्य ,शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते अशा गुणवत्तापूर्ण पायाभूत सोयीसुविधा बरोबरच शहर सुशोभिकरण, झोपडपट्टी पुर्नविकास अशा महत्वाच्या गोष्टीचांही या अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात आल्या असून नागरिकांच्या गरजा ओळखून विकासामुख आणि लोकाभिमुख असे पालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!