रसायनी दि.26: रसायनी मोहोपाडा परिसर औद्योगिक आणि बाजारपेठ साठी प्रसिद्ध आहे, येथील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोहोपाडा येथील खाजगी डॉक्टर मंडळींनी कर्तव्याची जाण न ठेवता हॉस्पिटल लॉकडाऊन केले आहेत.
जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे, त्या अनुषंगाने आपल्या देशातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबरीने वातावरण बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळाले आहे, वास्तविक सध्याची परिस्थिती पाहता खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने चालू ठेवणे आवश्यक होते. पोलीस, सरकारी दवाखाने व काही खाजगी दवाखाने आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत मात्र मोहोपाड्यात डॉक्टरांनी जणू हरताळ केला आहे. इतर वेळा रुग्णांची रांग असलेल्या ही दवाखाने सायलेंट मोड वर गेलेली आहेत, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. आजच्या परिस्थितीत विविध आजारांवर उपचारांची गरज आहे हे डॉक्टर मंडळी का लक्षात घेत नाहीत हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे. कोरोना वायरस आला म्हणजेच तो एकच आजार आहे का या व्यतिरिक्त दुसरे पण आजार आहेत ना मग डॉक्टर का सेवेपासून लांब जात आहेत, सरकारी रुग्णालयांकडे बोट दाखवण्याची आता सुरुवात झाली आहे पण या लोकसंख्येला ती व्यवस्था पुरणार आहे का हा विचार होणे गरजेचे आहे.
आजच्या परिस्थितीला पोलीस, सरकारी व्यवस्था चोखपणे कर्तव्य बजावताना दिसत आहे त्याचबरोबरीने किराणा, दूध, मेडिकल, भाजीवाले हे काही पैसा कमविण्यासाठी आटापिटा करत नाही तर सामजिक बांधिलकी जपत आहे. राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात असे अनेक दवाखाने आहेत की त्यामध्ये दूरवरच्या विविध भागातील नर्स, वॉर्डबॉय, काम करत आहेत, त्यांना नसेल का आरोग्याची आणि घरच्या लोकांची चिंता पण ती मंडळी पण आपली जबाबदारी ओळखून काम करीत आहेत, आजारपणात डॉक्टर देवाच्या रुपात असतो, असे म्हंटले जाते. आजच्या घडीला सर्व देऊळ बंद करण्यात आलेले आहेत, म्हणूनच देवळांप्रमाणे या आरोग्य देवाच्या दरवाजांना टाळे लागले आहे, असेच म्हणावे लागेल. मोहोपाड्यातील डॉक्टर सेवा का देत नाहीत, माणसाचा आणि कर्तव्याचा सोयीनुसार विसर तर त्यांना पडलाय का हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचे उत्तर वेळ देईल पण लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचे काय? हे दवाखाने बंद केलेले डॉक्टर सांगू शकतील का? असा प्रश्न तेथील गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!