अलिबाग, दि.17 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यात चौथ्या टप्प्यात दि. 31 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडून मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या लॉकडाऊन कालावधीत मूळचे कोकणातील परंतु नोकरीनिमित्त मुंबई,ठाणे परिसरात राहणारे अनेक नागरिक आपल्या मूळ गावी येनकेन प्रकारेन परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाकडूनही ई-पासद्वारे त्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सहकार्य केले जात आहे.
मात्र रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात खारपाडा मार्गे प्रवेश करणाऱ्या या नागरिकांची व्यवस्थितपणे नोंद व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या एकत्रित पुढाकारातून पेण तालुक्यातील खारपाडा येथे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे येथून चालत येणाऱ्या किंवा वाहनातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी नोंद घेतली जात आहे. त्यांची थर्मल स्कॅनरने तपासणीही केली जात आहे. संबंधित नागरिक कुठून आले आहेत, कुठे चालले आहेत, त्यांचा वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती नोंदवून घेतली जात आहे. नोंद होणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारल्यानंतरच त्यांना येथून पुढे सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर जे नागरिक चालत आलेले आहेत त्यांच्यासाठी फूड पॅकेट्स आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. स्वयंसेवी संस्था आणि शासन यांच्या समन्वयातून या चालत येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.
हे सर्व काम सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री अकरा आणि रात्री अकरा ते सकाळी सात अशा तीन शिफ्टमध्ये सुरू असून या संपूर्ण कामकाजाचा समन्वय साधण्यासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव, मुख्य वित्त व लेखा अधिकारी पाथरूड, तहसिलदार अरुणा जाधव, गटविकास अधिकारी अविनाश घरत, पोलीस निरीक्षक पवार, विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील, तलाठी अमित दुलगज, रशिद तडवी, पोलीस उपनिरीक्षक संगीता बोचरे, जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख, शिक्षक अहोरात्र तत्परतेने काम करीत आहेत.
दि. 11 मे पासून साधारणतः 35 हजार नागरिकांची नोंद येथे झाल्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी माहिती दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!