अलिबाग, दि.15 : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ (यू.डी.आय.डी.कार्ड) बनवून मिळण्यासाठी दर आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दाेन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दर बुधवारी केवळ अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी करण्यात येईल, त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केवळ 50 अस्थिव्यंग रुग्णांना टोकन देऊन तपासणी करून त्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र वितरित करता यावे, यासाठी विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सूचना देऊन तसे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच दर गुरुवारी अस्थिव्यंग सोडून इतर सर्व (नेत्रदोष, कर्णबधीर, मानसिक दोष इ.) दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाण्याची व्यवस्था केली जाईल. 
या कामासाठी लागणारे संगणक, प्रिंटर आदि आवश्यक साधनसामुग्रीकरिता आराेग्य प्रशासनाला आरसीएफकडून सहकार्य मिळणार आहे.   
अस्थिव्यंग रुग्णांना जिने चढताना अडचण येऊ नये, म्हणून दर बुधवारी अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी तळमजल्यावरील ओपीडी नं.14 मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक स्वत: बसून प्रमाणपत्र वाटप करतील,असा निर्णयही घेण्यात आला आहे. याप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप बुधवार, दि. 30 डिसेंबर व गुरुवार दि. 31 डिसेंबर 2020 पासूनच अंमलात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!