पनवेल दि.५: राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात आज “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात आले.
दरमहा १०० युनिट बिल माफ करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते त्यानुसार १२ महिन्यांचे १२०० युनिटचे वीज बिल माफ करा तसेच शेतकऱ्यांचे किमान पाच वर्षे वीज कनेक्शन कापू नये, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, संतोष भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, रुचिता लोंढे, वृषाली वाघमारे, महेंद्र पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, कामगारनेते रविंद्र नाईक, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुभाष पाटील, राखी पिंपळे, यांच्यासह कार्यकर्ते व वीजग्राहक सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीने राज्यातील जनतेची पिळवणूक करण्याचे ठाम केले आहे. त्यामुळेच हे सरकार जनेतला दिलासा न देता त्रास देण्याचेच काम करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. ऊर्जा मंत्र्यांनी वीज ग्राहकांना वीज बिलासंदर्भात गोड बातमी देऊ असे जाहीर केले होते. मात्र गोड ऐवजी कटू कारवाईचा बडगा उचलला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनता भरडून निघाली असताना राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते मात्र तसे न करता महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. त्यामुळे याचा जोरदार निषेध करत वीज बिल कमी करा गोरगरिबांना बिलात माफी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.