पनवेल दि.१४: पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारार्थ एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे २०० बेड उपलब्ध करून सदर रूग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. वाढती रूग्ण संख्या पाहता पनवेल मधील वैद्यकीय खाजगी हॉस्पिटल व कोव्हीड सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, आय.सी. यु. बेड उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे..
पनवेल महानगरपालिका हद्दीतील एमजीएम कामोठे हॉस्पिटल हे सोई-सुविधांनी सुसज्ज असे हॉस्पिटल असून कोरोना रूग्णांसाठी महापालिकेमार्फत किंवा शासनामार्फत २०० बेडची व्यवस्था झाल्यास पनवेल महानगरपालिका हद्दीतील रूग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहींना अतिशय तुटपुंज्या वेतनावर तसेच उद्योग धंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे. तसेच एकाच कुटूंबात २-३ कोरोना रूग्ण आढळत आहेत, त्यातच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आकारण्यात येणारा खर्च हा न परवडणारा असल्यामुळे रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने शासनामार्फत उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील रूग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे २०० बेड उपलब्ध करून सदर रूग्णांच्या उपचारासाठी होणारा खर्च महापालिकेमार्फत किंवा शासनामार्फत करण्यासाठी परवानगी द्यावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनात नमूद केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!